युवकाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून विरुगिरी; प्रशासनाची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 10:24 AM2022-05-10T10:24:39+5:302022-05-10T10:54:51+5:30
आंदोलनकर्त्याच्या या भूमिकेने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
यवतमाळ :दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी, दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी एका युवकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
श्याम गायकवाड असे या आंदोलनकरी युवकाचे नाव आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्ह नंबर ७ या शाळेच्या जमिनिवर आणि काही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी, शिवाय आपल्यावरील आत्महत्येच्या प्रयत्नाचा जुना गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकरी युवकाने केली. मात्र त्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या या युवकाने थेट आंदोलनाची भूमिका घेतली.
मंगळवारी सकाळी तो आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवर वर चढला. ही बाब काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस यंत्रणेसह निवासी उपजिल्हाधिकारी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आंदोलनकर्त्याची समजूत काढून त्याला टॉवर वरून उतरविण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना अजून यश आले नाही. तो आपल्या जिद्दीवर ठाम असून आंदोलनकर्त्याच्या या भूमिकेने प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडाली आहे.