जिल्हा परिषदेच्या विंधन विहिरी झाल्याच नाही
By admin | Published: June 9, 2014 12:09 AM2014-06-09T00:09:08+5:302014-06-09T00:09:08+5:30
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर
यवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर आता कुठे पंचायत समित्यांना विंधन विहिरी खोदण्याचे आदेश दिले आहे. केवळ टोलवा टोलवीचा प्रकार सुरू आहे.
जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांमध्ये टंचाईग्रस्त गावात तातडीची उपाय योजना म्हणून ४७ विधंन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. भू-जल सर्व्हेक्षण विभागाने याची पाहणी करून यापैकी २७ ठिकाणीच विहीर तयार करण्याची परवानगी दिली. यासाठी तब्बल २७ लाख ७0 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद यांत्रिक विभागाने मारेगाव तालुक्यातील कानड, चोपण आणि वणी तालुक्यातील रागंणा येथे विंधन विहीर तयार केली आहे. मात्र अजूनही २४ विंधन विहीर झाल्याच नाही.
२४ एप्रिल रोजी आर्णी तालुक्यात किन्ही धनसिंग, किन्हीगाव, केळापूरमध्ये मारेगाव पुनर्वसन, बहात्तर, दारव्हा तालुक्यातील पहापळ, बरबडी, घाटंजीतील टिपेश्वर पुनर्वसन, शिवणी कोलाम पोड, शिरोली पारधी बेडा, कोची बेलघर, उमरखेड तालुक्यात बारा, राळेगावमध्ये खैरगावपोड, वरध येथे विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश पंचायत समित्यांना दिले. त्यानंतर ८ मे रोजी पुसद तालुक्यातील शेलु खुर्द, मोख, शिवणी, चिंचघाट, वणीतील ढाकोरी बोरी, कळंबमध्ये मंगरूळ येथे विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ ९ मे रोजी यवतमाळ पंचायत समितीत बारडतांडा, बाभूळगाव येथे दिघी क्रमांक दोन, मारेगाव येथे घोगुलदरा, बिहाडी पोड, कोतुरला, नवरगाव, अर्जुनी गावपोड येथील विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना पैशाचे आवंटन पंचायत समित्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे पंचायत समितीस्तरावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.
बोअरवेल खोदणार्यांनी पंचायत समितीकडे आवंटन किती आहे, तरच कामाचा करार करा, अशी भूमिका घेतली. पैसाच नसल्याने कोणीच करार केला नाही. केवळ उदासीन प्रवृत्तीमुळे संपूर्ण उन्हाळ्य़ात केवळ तीन विंधन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यावरून जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाच्याबाबतीत किती सजग आहे हे दिसून येते. उन्हाळ्य़ात पाणी नसल्याने पायपीट करणार्या ग्रामस्थांच्या हाल अपेष्टांची जाणीव यंत्रणेतील एका अधिकारी कर्मचार्याला नसल्याचे दिसून येते. पैसा असुन वेळेत काम करता आले नाही.
आता पावसाळा तोंडावर आल्यानंतरही काम होते की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या उन्हाळ्य़ात मंजुर झालेले काम पुढच्या उन्हाळ्य़ापूर्वी तरी पूर्ण व्हावे, एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांना आहे. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या विभागाची ही स्थिती आहे. यावरून इतर विभागात काय चालले आहे, याची कल्पना येते. लोककल्याणकारी योजना फाईलांमध्ये दडपण्यात तरबेज असलेल्या यंत्रणेला प्रत्यक्ष कामाला लावण्यात येथे अध्यक्ष प्रवीण देशमुखही अपयशी झाले असे, म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या मुद्दावर अध्यक्षांनी अनेकदा पाणीपुरवठा समितीची बैठक घेतली आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यच असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)