‘ग’राड्याचे निवारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:20 AM2019-10-04T05:20:24+5:302019-10-04T05:20:32+5:30
त्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो.
- विजयराज बोधनकर
त्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. दिवसाची सुरु वात सकारात्मक कशी होईल याचा मनात आराखडा तयार करतो. त्यानुसार पूर्ण दिवसभर काम करतो, रात्री आनंदाने झोपतो. यात त्याची एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे तो मनाला त्रास देणाºया गोष्टी डोक्यातून काढून टाकतो, म्हणजे तो नेमकं काय करतो हे जेव्हा त्याच्याकडून समजून घेतलं तेव्हा ते जास्त महत्त्वाचं वाटलं. तो उगाच वायफळ बडबड करणाºया मित्र परिवार आणि नातेवाइकापासून स्वत:ला वाचवतो. बुद्धीचा वापर न करणारे, लॉजिकली न बोलणारे त्याला आयुष्यात पराजित झालेली माणसं वाटतात. इतरांचा सतत अपमान करणारे, सामान्य गोष्टीसाठी खोटं बोलणारे, पुढे जाणाºया व्यक्तींना मागे खेचणारे, कुठलाही सत्याचा आधार नसताना कुणाविषयी सतत खोटा प्रचार करणारे, इतरांविषयी गैरसमज निर्माण करणारे, चांगले वर्तन असणाºया स्त्री-पुरुषांना सतत बदनाम करण्याची संधी शोधणारे, यशस्वी माणसांचा द्वेष, मत्सर करणारे. अशा अनेक वाईट गोष्टी करत जगणाºया व गची बाधा झालेल्या माणसांच्या गराड्यापासून तो सतत वाचवत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात कधीच दु:खमय प्रसंग येत नाही. त्याला अशी माणसे चटकन ओळखता येतात. आयुष्य जगताना काटे आणि फुले कुणाच्या मनात दडलेली असतात हे ओळखणेसुद्धा एक कला असते. यात सफल होतो तो स्वत:चा विकास करत कुठलाही भ्रष्टाचार न करता घवघवीत यश प्राप्त करू शकतो, हेच तर भगवत गीतेत सांगितले आहे. गीता ही कर्मातून फुलते, जगताना अर्जुनाची भूमिका स्वीकारताना मन आणि बुद्धीला कृष्ण म्हणून स्वीकारलं तर विकृतीच्या ‘ग’राड्यात माणूस कधीच अडकू शकत नाही, याची ग्वाही स्वत: स्वत:ला माणूस देऊ शकतो.