- डॉ. रामचंद्र देखणेअध्यात्माची सिद्धता ही आध्यात्मिक साम्यभावात भेद मावळणे आणि अभेदत्व उभे राहणे हेच भक्तिमार्गाचेही प्रयोजन ठरते. तर द्वैत सोडणे आणि अद्वैत मोडणे हे परमार्थाचेही प्रयोजन ठरते. भक्तीची अवस्था ही अद्वैती परमानंदी अशी आहे.हाचि परमानंद आलंगीन बाही।क्षेम देता ठायी द्वैत तुटे।।या परमानंदाला आपल्या बाहूंनी आलिंगन देतो आणि आलिंगन दिले की द्वैत नाहीसे होते. परमानंदी आलिंगन हे ब्रह्मभावाचे लक्षण ठरते. ज्ञानदेवांनी ब्रह्मभावाला गेलेल्या श्रेष्ठ भक्ताचे लक्षण सांगताना ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात म्हटले आहे,जो आत्मलाभासारिखे।गोमटे काहीचि न देखे।म्हणौनी भोग विशेखे।हरिखे जेना।। १२/१९०इथे ज्ञानदेवांनी आत्मलाभ हा शब्द ब्रह्मप्राप्ती या अर्थाने वापरला आहे. गीतेच्या बाराव्या अध्यायातील‘यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काडङ्क्षति।आणि सम: रात्रौ च नित्रेच’ या दोन श्लोकांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्य करताना ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यातील अनेक ओव्या या समभावाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. प्रस्तुत ओवीतून ज्ञानदेव सांगतात की, ज्याला आत्मलाभ झाला आहे. ब्रह्मप्राप्ती झाली आहे, जो ब्रह्मरूपाने आपणच विश्व झाला आहे. ज्याचा जीव जीवातील, जीव जडातील, जीव ईश्वरातील आणि ईश्वर जडातील भेदभाव सहज गेलेला आहे. आणि ब्रह्मप्राप्तीमुळे जो अभेदरूपाने वावरतो आहे. तो ‘भोग विशेखे हरिखे जेना’ सामान्य भोगप्राप्तीने काय आनंदित होणार? तो विषय भोगाच्या केव्हाच पलीकडे गेलेला आहे. तो समत्वदर्शी झाले आहे. असा ब्रह्मभाव येण्यासाठी काही अवस्था आहेत. पहिली आहे द्वैतभाव, नंतर जीवऐक्यभाव, नंतर जीवशिव ऐक्यभाव आणि ब्रह्मभाव. सूर्याच्या ठिकाणी अंधार व दिवस हे दोन्ही जसे संभवत नाही. त्याप्रमाणे त्या भक्ताच्या ठिकाणी चांगल्या-वाईट कर्माचे किंवा भोगाचे संस्कार उमटत नाहीत. तो शुद्ध ज्ञानरूप होऊनच राहिला आहे. ज्ञानदेव अद्वैतभक्तिचाच पुरस्कार करतात. नव्हे तर तिलाच ज्ञानभक्ती असेही म्हणतात. योगमार्गाला भक्ती आणि भक्तिमार्गाला ज्ञान तर ज्ञान आणि योगमार्गाला पुन्हा भक्तीची जोड देऊन अध्यात्माला सामाजिकतेच्या अंगाने पुढे नेऊन अद्वैती साम्यभावच उभा करतात.
अद्वैत साम्यभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:59 AM