मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:39 AM2019-07-15T08:39:47+5:302019-07-15T08:43:46+5:30
कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते.
कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते. समाजरचनेत सामाजिक सामंजस्याचे विचार रुजवायचे असतील तर भक्ती, वाङ्मयीन, शैक्षणिक चळवळीतही त्या व्यक्तीचे ‘मन’ समजून घेणे गरजेचे असते. समाजात असे कितीतरी लोक आहेत की कुणाच्याही मनाचा विचार न करता काही गोष्टी घडवतात. समाजातील तर्क-वितर्क मनावरच अवलंबून असतात. अज्ञानाने निर्माण झालेल्या घटनांचा मनावर आघात होतो. त्या मनावर घडलेल्या संस्काराचा परिणाम समाजात जाणवतो. व्यक्ती -व्यक्ती मिळून समाज होतो. त्या समाजाचे ‘मन’ ओळखून समाजात काही लोक वागतात. त्याचे कारण त्या-त्या समाजाची जडणघडण समजावून घेणे, त्या प्रक्रियेत कार्यरत होणे ही प्रत्येक माणसाची व समाजाची धडपड असते. कारण समाजात चांगल्या मनाचा उपयोग होऊ शकतो.
माणसाच्या माणूसपणाची ओळख मनावरूनच होते. मनाच्या कप्प्यात प्रथम एखादी कृती तयार होते, मग त्यावरून त्या व्यक्तीचे मूर्तरूप लक्षात येते. माणसाचे व्यक्तिगत अथवा सार्वजनिक अनुभव व्यक्त करण्याचे साधनही मनच आहे. मनामुळेच मनुष्याच्या स्वभावात बदल घडतो. अस्तित्वाच्या लढाईत मन कधी सबळ अथवा दुर्बल बनते. कोणतीही क्रांती त्या व्यक्तीच्या वैचारिकतेवर घडत असते. त्याच्यातील आमूलाग्र बदल मन:स्थितीवर अवलंबून असतात. मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया आहे. वर्तनानुसार त्याच्या मनाची ओळख होते. मनाचे अध्ययन मानसशास्त्रात केले आहे. एकाच व्यक्तीच्या मनात वारंवार विकल्प येतात तेव्हा त्याकाळात मनाची एकच एक स्थिर अवस्था अस्तित्वात नसते. गतिशील मनाचे परिवर्तन होत असते. एक मन परिवर्तनशील असते, तर दुसरे मन अस्तित्वाचा विचार करते. ह्या दोन्ही मनाचा अभ्यास अनुभवविश्वावर चालत असतो. मनामुळेच व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मनाची एकात्मता आणि समाजाची अस्मिता महत्त्वपूर्ण असते. मनाच्या अवस्थेचा समाजाच्या जीवनसरणीवर परिणाम होतो. मनाच्या साह्याने सर्व गोष्टी नियंत्रित केल्या जातात. माणसाच्या वर्तनाची अंगभूत बाजू मनावर परिणाम करते. विचार करण्याची प्रक्रिया मनाची आहे. मनाच्या अनुभवविश्वाशी आपली गाठ बांधली पाहिजे. न कळत मनातील इच्छा, आकांक्षा, भव-भावना प्रसंगानुरूप प्रकट होतात.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)