आनंद तरंग: विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 05:00 AM2019-06-04T05:00:05+5:302019-06-04T05:00:27+5:30

मंथन म्हणजे निकोप वादसंवाद. चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा, त्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे

Ananda Tarang: Ideology | आनंद तरंग: विचारमंथन

आनंद तरंग: विचारमंथन

Next

बा.भो. शास्त्री

विचार हिच खरी माणसाची ओळख आहे. तोच वजा झाला की त्याला दोन पायाचा पशू म्हटलं जातं. याच कारणाने, सद्गुण नसलेल्या माणसाला आपण बैल, गाढव, कुत्रा म्हणत असतो व दुर्गुण संपले की आता तो माणूस झाला असं आपण म्हणत असतो. बालपणाची कोमलता निरागसता, हास्य निघून जाते, मग ‘‘रम्य ते बालपण’’ आपणच म्हातारपणी म्हणायला लागतो. त्या बालपणाचं नुतनीकरण करता येत का? कमजोर झालेला आचार व लुप्त होणारा विचार ताजा होईल का? या प्रश्नाचं उत्तर श्रीचक्रधर एका सूत्रातून देतात,
‘‘परस्परें मथन किजे मग नूतन होए:’’
तेच भांडं घासल्यानं चकाकतं, तेच वस्त्र धुतल्याने निर्मळ होत. तिच जागा झाडू मारला की स्वच्छ दिसते. तेच टाकाऊ टिकाऊ करता येतं. तसं जुन्याला नवं करता येत का? त्यासाठीच परस्परात विचाराचं मंथन करावं असं स्वामी म्हणतात. मंथनाशिवाय लाकडातला अग्नी व दह्यातलं लोणी बाहेर पडत नाही आणि अंतवंताचं मंथन झालं तरच अनंताची उपलब्धी असते.
‘‘मंथनी नवनीता तैसे घे अनंता
वाया व्यर्थकथा सांडी मार्ग’’
असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. मंथन म्हणजे निकोप वादसंवाद. चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा, त्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे. केवळ जिज्ञासेने प्रगतीसाठी झालेले प्रश्नोत्तरं असतात. गीतेच्या समारोपात संजय कृष्णार्जुनाच्या संवादाचं अप्रतिम वर्णन करतो. धृतराष्ट्राचे सगळे दडपणं झुगारुन आपला समोरोपिय व अंतीम निर्णय देतो. मधूर संवादाचं अतिउत्साहाने कौतुक करतो.
‘‘राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्’’
केशवार्जुनयो:पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहु:’’
अशाच प्रकारचा आनंदवर्धक संवाद स्वामींना अपेक्षित आहे. ज्या चर्चेत सुख श्रेय आणि शृंगार नाही त्याला अरण्य रुदण म्हटलं आहे. परस्परे या शब्दात दोन टोकांचं घुसळण आहे. एक सत्तापक्ष, एक विरोधीपक्ष. विरोध म्हणजे व्यत्यय दूर करणारा चुका ध्यानात आणून देणारा, भांडणारा नव्हे. त्याला बोधपक्ष असंही म्हणतात. समुद्रमंथन झालं तेव्हा असून व देव यांच्यात झालं. गीता दोघांच्या संवादातच जन्माला आली. गुरु शिष्याच्या संवादात शास्त्र तयार झालं. विचाराच्या मंथनातून सिद्धांत जन्माला आहे. कालबाह्य झालेले टाकावू टाकायचं व ग्राह्य स्वीकारायचं हाच उद्देश असतो. काही आचार विचार काल सापेक्ष स्थल सापेक्ष व व्यक्ती सापेक्ष असतात. त्यांना आपण शाश्वत करण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा अडचण होते. कधीतरी गृहित धरलेलं सत्य आज असत्य असल्याचं ध्यानात आलं तर ते नाकारता येणं यालाच विचार म्हणतात. जुन्याचा आशय तसाच ठेवून मानवतेला पुरक नवा अर्थ समाजाला देणे. अथवा ज्या शास्त्राचा विसर पडला त्याला चर्चेतून पाखडून घेण्यासाठी हे सूत्रं अवतरलं आहे. सिद्धांत नित्यनूतन वाटला पाहिजे. असा विचारविमर्ष तर घरातही महत्वाचा आहे. सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला तर, सुखकारकच असतो. जमीन घ्यायाची असेल तर सर्वांसमोर प्रस्ताव मांडा. सदस्य प्रश्न विचारतील कुठे आहे, हलकी की भारी पाणी आहे, रोडलगत आहे, मार्केट तिी दूर आहे, पैसे आहेत, हा पूर्वपक्ष आहे व याचं समर्पक उत्तर देतो याला सिद्धांत पक्ष म्हणतात. एकमताने निर्णय घेतला तर ते मंथनातून निर्माण झालेलं नूतन आहे.

Web Title: Ananda Tarang: Ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.