चिंता ही चितेसमान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:59 PM2019-05-25T17:59:02+5:302019-05-25T17:59:06+5:30
चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही.
जीवनातील अनेक लहान-मोठया प्रसंगांना सामोरे जाताना मनात खूप चिंता दाटून येते. काही तरी नकोसे होणार आहे, वाईट होणार आहे, मनाविरुद्ध होणार आहे, या भीतीने जीव बेचैन होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मनुष्याने अजिबात ‘नर्व्हस’होता कामा नये. जीवनात कितीही वाई घडले; वाईट झाले तरी, संयम आणि वेळेच्या औषधाने एकदिवस सर्वकाही बरे होते. कालांतराने सर्व संकटे ही पुरस्कारच घेवून येतात. असा आत्मानुभव प्रत्येकाला येतो. चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चिंतेचे प्रमाण जास्त आहे. बºयाच स्त्रिया आपले संपूर्ण आयुष्य विविध प्रकारच्या चिंतेच्या छायेखाली जगतात. काही स्त्रियांमध्ये या सामान्य वाटणाºया चिंतेचे विविध आजारामध्ये रूपांतर होते. चिंता ही शरीराला हळुहळु खातं जाते. त्यामुळे सकारात्मक उर्जेने चिंतेला सामोरे जाणं गरजेचे आहे. स्त्रियांनी साºया दु:खाला हसत-हसत सामोरे गेलं पाहीजे.
चिंतेच्या आजारात एखादी न सोसणारी त्रासदायक घटना या लक्षणांची सुरुवात करते. मग ही लक्षणे सोसणेसुद्धा रुग्णास असह्य होते. सांगता येत नाही व सोसतही नाही असे अवघड दुखणे म्हणजे चिंतेचा आजार. म्हणूनच चिंतेबाबत स्वत:शी तर्क करत बसण्यापेक्षा तणाव वा चिंता कमी करणं हाच सर्वात उत्तम उपाय आहे.
जीवनात अनेकदा जे वाईट झाल त्याचा स्वीकार करून पुढे जाव लागत. हे झाल आहे, आणि ते बदलू शकत नाही. परंतु मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार. या सकारात्मक विचारांनीच जीवनात सर्व समस्यांना सामोरे गेलं पाहीजे. आयुष्यात अनेक जण अनेक लोक अपयशी झालेत. मात्र, त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. तसंच चिंता सोडल्यास मनुष्य सुखी होवू शकतो. दुर्घटना आपल्या जीवनात दु:खाच कारण नाही, तर दु:ख झेलू शकण्याची योग्यता नसणं हे दुख:च कारण आहे.
- शुभांगी नेमाने
शिर्ला नेमाने, ता. खामगाव.