अस्मिता-अभिमान-परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:26 AM2018-03-22T05:26:10+5:302018-03-22T05:26:10+5:30
वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते.
- डॉ. रामचंद्र देखणे
वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. माणूस हा काही मूल्ये, काही संस्कार, काही परंपरा आणि काही आदर्श घेऊनच जगत असतो. हे आदर्श, ही परंपरा, हे संस्कार त्याला एकीकडे जगण्याला आनंद देतात तर दुसरीकडे जगण्याची दिशा. त्याच्यावर घडणाऱ्या संस्काराप्रमाणे किंवा विचारप्रणालीप्रमाणे तो वागत असतो. आणि त्या परंपरेचा अभिमान बाळगत असतो. एकीकडे अभिमान हा महान सतकृती ठरतो तर दुसरीकडे वृथा अहंकार व त्याचा अभिमान ही विकृतीही. देश, संस्कृती, भाषा, भूमी, आई-वडील, घराणे, गाव या विषयीचा अभिमान हा एका संस्कृतीलाच उभा करतो. माझ्या घरी पंढरीची वारी आहे. माझ्या आजोबांपासून आमच्या घरात प्रत्येक पिढीत एक एक शिक्षक आहेत.
सातारा जिल्ह्यात एक गाव असे आहे की, त्या गावातील प्रत्येक घरातील एक माणूस सैन्यदलात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. गावकºयांना गावच्या या परंपरेचा अभिमान आहे. म्हणून अभिमानाची परंपरा बाळगण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा. ज्ञानदेवही काही वेळा अभिमानाचा अविष्कार घडवतात.
तयाचिये देशींच्या झाडी। कल्पतरुते होडी।
न जिणावे का एवढी।
मायबापे असता।। (ज्ञानेश्वरी १८/१६४२)
ते पाषाणही आघवे। चिंतारत्ने का नोहावे।
तिये भूमिके का न यावे।
चैतन्याच।। १८-१६४३
ज्ञानदेव म्हणतात, ज्या देशात ऐश्वर्यशक्तीचा महामेरू भगवान कृष्ण आहे आणि समृद्धीचा आगर असणारी साक्षात लक्ष्मी ही वास करते आहे. तिथल्या माणसांनी करंटे का राहावे? त्या देशातील झाडांनी कल्पतरुची बरोबरी का करू नये? तिथल्या सर्व दगडांनी चिंतामणी का होऊ नये? आणि तिथल्या भूमिलाही चैतन्यत्व का प्राप्त होऊ नये? तिथल्या नद्या अमृत घेऊन का वाहू नयेत? आणि तिथल्या माणसांना ‘सच्चिदानंद पद’ का लाभू नये? मानवी जीवनाला वैराग्य, अनासक्ती, शमदम यासारख्या निवृत्तीवादात अडकविणारे ज्ञानदेवांचे विचार नाहीत तर आदर्शाची अस्मिता जागवून पुरुषार्थप्रधान आनंद देणारे शुभ प्रवृत्तीवादी विचार आहेत. निवृत्तीवादी तत्त्वांचे रक्षण होण्यासाठी शुद्ध प्रवृत्तीवाद जपायला हवा.