आनंदाचे पैलू प्रेम नि कर्तव्यभावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:27 PM2019-09-06T22:27:48+5:302019-09-06T22:36:18+5:30

शिवराजधानी रायगडावरील लोकांच्यातही कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह होता.

Aspects of happiness are love and duty | आनंदाचे पैलू प्रेम नि कर्तव्यभावना

आनंदाचे पैलू प्रेम नि कर्तव्यभावना

Next

- रमेश सप्रे

गोष्ट तशी परिचित आहे. निदान आधीच्या पिढीतील मंडळींना तरी निश्चितच. काही जणांच्या तर पाठय़पुस्तकात असेल ती.
तर दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. म्हणजे काव्य-शास्त्र-विनोद-संगीत-नृत्य आदींच्या आनंदानुभवात उघडय़ावर म्हणजे आकाशाच्या खाली पूर्णचंद्राच्या प्रकाशात आरोग्यपूर्ण दूध पिण्याचा. आरोग्यदेवता अमृताचा कुंभ घेऊन ‘को जागरति? को जागरति?’ म्हणजे ‘कोण जागं आहे? कोण जागं आहे?’ असं म्हणत जागृत असलेल्या लोकांच्या मुखात अमृताचे थेंब टाकत जात असते. असा सर्वाचा समज.

काहीसा डोळस, काहीसा भाबडा समज. हेतू हा की पावसातल्या मेघ झाकल्या पौर्णिमेनंतर फुलणा-या पहिल्या अश्विनी पौर्णिमेला चंद्रप्रकाशाला आनंदी जीवनाचा आधार तर चंद्रप्रकाश जीवनरसाचा आधार. ‘मी सूर्य बनून सर्व सजीवांच्या प्राणाचा आधार बनतो तर चंद्र बनून सर्व रसाचं पोषण करतो’ असं प्रत्यक्ष भगवंतानंच गीतेत म्हटलंय ना? असो.

शिवराजधानी रायगडावरील लोकांच्यातही कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह होता. गवळी मंडळींनीही जरा जास्तच दूध विक्रीसाठी आणलं होतं. त्यातल्या एका गवळणीला पोचायला उशीर झाल्यामुळे दूध विकण्यासाठी अधिक प्रय} करावे लागले. यामुळे तिला परतायला उशीर झाला. या गवळणीचं नाव होतं हिरा. आपल्या बोलक्या स्वभावामुळे तशी हिरा लोकप्रिय होती. त्या दिवशी मात्र दूध संपायला उशीर झाल्यामुळे तिच्या लक्षातच राहिलं नाही की गडाचे दरवाजे सायंकाळी सात वाजता बंद होतात ते सकाळी उघडेर्पयत बंदच राहतात. दरवाजावर बंदोबस्तासाठी खास विश्वासू आणि शूर शिपाईगडी असतात.

धावत पळत हिरा दरवजाकडे पोचली तेव्हा ते नुकतेच बंद झाले होते. तिनं द्वारपालांची खूप विनवणी, मनधरणी केली; पण नियम म्हणजे नियम. तिला सांगण्यात आलं ‘आजची रात्र गडावरच काढावी लागेल. कुणाच्याही घरात रात्रीसाठी आश्रय मिळू शकेल.’ हिरानं आपल्या दूध पित्या बाळाची गरज सांगूनही गडाचं दार उघडणं तर सोडाच, साधं किलकिलंही केलं गेलं नाही. आता हिराच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण विश्वात तिला फक्त आपलं बाळच दिसत होतं. ते भुकेनं रडतंय, त्याच्या किंकाळ्या नि हुंदके हिराला ऐकू येऊ लागले.

कोणाच्याही हृदयाला पाझर फुटत नाही हे लक्षात आल्यावर हिरा गडावरून खाली जाण्याचा मार्ग शोधू लागली. पाहते तो सगळ्या बाजूंनी अभेद्य तटबंदी. स्वराज्याची राजधानी होती ना ती? नाही म्हणायला एका ठिकाणी तट बांधला नव्हता. संध्याकाळच्या मंद प्रकाशात खाली पाहिल्यावर हिराच्या लक्षात आलं की तो भाग होता अवघड कडय़ाचा. उतारावर काही झुडपं वाढलेली होती. एका बाजूनं मृत्यूला आमंत्रण देणारा तो उंच कडा तर दुस:या बाजूला भुकेनं कळकळणारं तान्हं बाळ, छातीत साठून राहिलेला लाडक्या पिलासाठी असलेला दुधाचा पान्हा. काय करावं ते समजत नव्हतंच.

हिराच्यातच एक सावध विचार करून निर्णय घेणारी बाई होती तशीच बाळासाठी व्याकूळ झालेली अगतिक आईही होती. ‘तिकडे माझं लाडकं बाळ भुकेनं तडफडणार असेल तर इथं मी तरी जगून काय करू?’ हा विचार मनात प्रबळ होत गेला नि देवी भवानीचं नाव घेऊन हिरानं कडय़ावरून उडी मारली. अक्षरश: अंधारातली उडी होती ती. पण एका मातेनं पुत्रवात्सल्याच्या अनावर ओढीनं जीवावर उदार होऊन मारलेली उडी होती ती. दुसरे दिवशी हिरा गवळण कुठेही न दिसल्यामुळे शोधाशोध सुरू झाली; पण तिचा पत्ता काही लागला नाही.

पाहतात तर काय नेहमीच्या वेळी डोक्यावरच्या टोपलीत दूध-ताक-दही घेऊन हिरा गवळण गडावर हजर. अंगावर थोडं खरचटल्याच्या खुणा होत्या. शिवरायांच्या कानावर हे वृत्त गेलं तेव्हा त्यांनी हिराला बरोबर घेऊन जातीनं त्या कडय़ाच्या भागाची पाहाणी केली. हिराच्या वात्सल्याचं, धैर्याचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. खास दरबारात बोलवून खणानारळानं ओटी भरून तिचा सत्कार केला. त्या दिवसापासून तिला हिरा या नावाऐवजी ‘रायगडची हिरकणी’ ही गौरव करणारी पदवीही दिली.

त्याचवेळी असामान्य दूरदृष्टी असलेल्या शिवरायांच्या मनात एक विचार चमकून गेला. एक स्त्री जर कडा उतरून जाते तर शत्रूचं सैन्य कडा चढून गडावर प्रवेश करू शकेल. गडाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खूप घातक ठरू शकतं. या विचारानं राजांनी आज्ञा देऊन ताबडतोब त्या ठिकाणी बुरूज बांधला त्याला लोक ‘हिरकणीचा बुरूज’ म्हणू लागले. एका मातेला धन्यतेच्या आनंदासाठी सन्मानीत करणारे शिवराय राजा म्हणून प्रजेच्या संरक्षणाचं आपलं आद्य कर्तव्य विसरले नव्हते. एवढंच नव्हे तर एका मातेचा आक्रोश ऐकूनही नियम न मोडणा:या त्या कर्तव्यतत्पर, स्वामीनिष्ठ द्वारपालाचा सत्कारही राजांनी केला.
खरंच आहे आनंदाच्या अनुभवाचे प्रमुख पैलूच आहेत. प्रेम नि कर्तव्यभावना!

Web Title: Aspects of happiness are love and duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.