‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी  झालो परदेशी तुझविण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:08 AM2019-07-11T10:08:38+5:302019-07-11T10:08:42+5:30

सत्संगातील वारी

'Ba Re Panduranga when you visited a foreigner, you were born' | ‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी  झालो परदेशी तुझविण’

‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी  झालो परदेशी तुझविण’

googlenewsNext

 पांडुरंगाची केव्हा भेट होईल, याची तीव्र इच्छा बाळगून मार्गस्थ झालेले वारकरी भाविक वाखरीपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव आहे. मला माझा प्राणप्रिय विठोबाचे दर्शन केव्हा मिळेल? वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या मुक्कामाला येतात. आषाढ शुद्ध दशमीला विसाव्याजवळ सर्व पालख्यांचे उभे रिंगण केले जाते. प्रत्येक पालखीतील अश्व रिंगण पूर्ण करून पंढरपूरमध्ये प्रवेश करतो. विसाव्याजवळ पालखीतील पादुका गळ्यामध्ये घेतल्या जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील माऊलींच्या पादुका आरफळकर मालकांच्या घरामध्ये दिल्या जातात.

या सर्व संतांच्या पादुकांसहित वारकरी भाविक चंद्रभागेजवळ येऊन पादुकांना स्नान घातले जाते. आणि नंतर पंढरीमध्ये नामस्मरण करत आपल्या स्थानावर या पालख्या पोहोचतात. पालखी प्रस्थान करून मार्गक्रमण करणाºया वारकरी, भाविक मंडळींना आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहºयावरून ओसंडत असताना पाहावयास मिळते. आपण पंढरीच्या वारीचा जो नित्यनेम स्वीकारलेला आहे तो पूर्णत्वास जात असल्याचा आनंद त्यांना होतो. संतांच्या संगतीमध्ये आपणाला सेवा करता आल्याचे भाग्य वारीमध्ये लाभले. संतांच्या बरोबर मला वारी पूर्ण करता आली, हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो.

कारण संतांची संगती ही जीवनामध्ये खूपच दुर्लभ असून, देवकृपेशिवाय प्राप्त होत नाही. ‘बहू अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करून केली’ या संत वचनाप्रमाणे सत्संग हा खूपच कठीण असून, मनुष्य जीवनासाठी तो महत्त्वाचा आहे. अशी संगती वर्षातून एकदा वारीमध्ये आपणास मिळते व त्या संगतीमध्ये सेवा करता येते. सत्संगातील साधनेला व सेवेला खूपच महत्त्व आहे. ‘ते ज्ञान पै गा बरवे जरी मनी आनावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी’ ज्ञानप्राप्तीसाठी सेवा हे एकमेव माध्यम आहे. ती सेवा अठरा दिवस वारीमध्ये व्यवस्थितरीत्या करता येते. निष्काम सेवेचे संस्कार व्हावेत, यासाठीच वारीचा प्रघात पाहावयास मिळतो. असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण वारीमध्ये चालणाºया भाविकांना सत्संग देऊन सेवा प्राप्त करून देण्याची देवकृपा सहज मिळते. त्यामुळे वारी करणारा भाविक हा भाग्यवान ठरतो.

या भाविकाला ही साधनसामुग्री उपलब्ध करण्यासाठी स्वप्रयत्न करावा लागत नाही. या संगतीतील वारीचा, भजनाचा, सेवेचा आनंद उपभोगण्यासाठी नित्यनेमाने वारी करणारे भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले असतात. ‘चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवी वरा पाहू’ त्यामुळेच जन्माला आलेल्या सर्व जीवाला आवाहन केले जाते. जीवनामध्ये आपण पंढरीची वारी केली पाहिजे. ज्या भाविकांना वारीचे महत्त्व लक्षात आलेले आहे ते दरवर्षी निष्ठेने वारीमध्ये सहभागी होतात. देवाला ही प्रार्थना करतात, माझा हा नित्यनियम कधीही चुकू देऊ नको. ‘पंढरीची वारी चुको न दे हरी’
- सुधाकर इंगळे महाराज

Web Title: 'Ba Re Panduranga when you visited a foreigner, you were born'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.