आध्यात्मिक उन्नतीसाठी उत्तम श्रोता बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:55 PM2019-09-09T16:55:17+5:302019-09-09T16:58:14+5:30
आध्यात्मिक
सोलापूर : ‘श्रवण ही देखील एक भक्तीच होय. उत्तम श्रोता बनण्यासाठी श्रवणभक्तीस प्रारंभ करा. कारण ऐकणे ही देखील एक कला आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी उत्तम श्रोता बना. आपण श्रवणाची बाजू भक्कम केली तर आपल्याला भक्तिमार्गात पुढे जाण्यास मदत होईल’, असे प्रतिपादन गौतम मुनीजी यांनी केले.
प. पू. श्री विनय मुनिजी म.सा.यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरु आनंद कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, उत्तम श्रोत्यांची लक्षणे सांगताना ते म्हणाले, श्रोत्याने नेहमी वक्त्याला दिसेल असे वक्त्याच्या सन्मुख बसावे. प्रवचन, कीर्तन वा सभा चालू असताना लक्षपूर्वक ऐकावे. आळस निद्रा झटकून संत सांगतील ते लक्षपूर्वक ऐकावे. आपापसात बोलू नये. सभा सुरू असताना वक्त्यांच्या वाक्यांना किंवा बोलण्यास दाद द्यावी त्यामुळे सभेतील उत्साह वाढण्यास मदत होते.
देव, गुरू, संत यांना नमन करण्याच्या पद्धतीही त्यांनी सांगितल्या. आपण मंदिरात गेलो की नेहमी उजव्या बाजूने प्रदक्षिणा माराव्यात. प्रदक्षिणा व आरती कसे करावे हे देखील त्यांनी सांगितले. प्रवचन हे समाजावर प्रभाव पाडण्याचे फार मोठे साधन आहे. अनेक लोकांना संतांनी या मार्गावर वळवून भगवंत भक्त बनवले आहे. मनाने आपण त्या स्वरूपाचे त्या परब्रह्माची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
संत हे ज्ञानस्वरूप असतात म्हणून ते पूजनीय असतात. त्यांना आदरपूर्वक वंदना म्हणजे आराधना होय. आत्मिक कल्याणासाठी संतांची मनापासून सेवा करा, त्यांनी केलेले उपदेश ऐका आणि त्याप्रमाणे आपले आचरण ठेवा. त्यांच्यापुढे विनम्रपणे बसून त्यांची दिव्य वाणी ऐका. सत्संगाची संधी मिळण्यास सौभाग्य लागते. अशी संधी मिळाली तर त्याचा लाभ घ्या. कारण संतांची वाणी म्हणजे साक्षात अमृत होय.