अंत्यसंस्कारासाठी हाल होत असल्याने भिल्ल समाजबांधवांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:39 PM2019-07-16T18:39:05+5:302019-07-16T21:50:55+5:30
मेहुणबारेत स्मशानभूमीचा वाद : ग्रा. पं. कार्यालयासमोरच नेले खड्डा खणण्याचे साहित्य
मेहुणबारे, ता.चाळीसगाव - येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीच्या वादावरून अंत्यसंस्कारासाठी नेहमीच हाल होत असल्याने संतप्त झालेल्या भिल्ल समाजाच्या शेकडो ग्रामस्थांनी अंत्ययात्रेसाठी थेट ग्रामपंचायत कार्यालय आवारातच खड्डा खोदण्यासाठी तेथे धडक दिली. या ठिकाणी त्यांनी तब्बल तीन तास ठिय्या मांडला. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या या घटनेने वातावरण तापले होते.
येथील नवेगाव भागातील इंदिरा नगरमध्ये सोमवारी भिल्ल समाजातील उत्तम आनंदा सोनवेण (६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या भिल्ल समाज बांधवांनी टिकाव व फावडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले व ग्रामपंचायतीच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्याचा निश्चय केला यामुळे एकच खळबळ उडाली होती.
भिल्ल समाजातील स्मशानभूमीच्या वादाचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून सुटत नसल्याने त्यांना अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. या विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याने यावेळी समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली.
आश्वासनानंतर ठिय्या मागे
या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला कळताच घटनास्थळी ग्रामविस्तार अधिकारी रांजेद्र पाटील, मंडळधिकारी गणेश लोखंडे, सरपंच संघमित्रा चव्हाण, यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. स्मशानभूमीसाठी असलेली जागा लवकरच देण्यात येईल. त्या जागेची मोजणी करून तेथील अतिक्रमण हटवून ती जागा भिल्ल समाज बांधवांसाठी उपलब्ध करून दिली जाईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचातीतर्फे दिल्यानंतर उपस्थित भिल्ल समाज बांधवांनी माघार घेतली. त्यानंतर मृत व्यक्तीवर तिरपोळे रस्त्यालगत असलेल्या जागेवर अंत्यंस्कार करण्यात आले.
स्मशानभूमीचा प्रस्ताव मार्चपासून तहसीलदरांकडे
मेहूणबारे येथे अनेक वषार्पासून भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. मेहूणबारे ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३९६ मध्ये भिल्ल समाजातील स्मशानभूमीसाठी ८० आर जागा दिली असल्याचा ठराव २५ जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत केला होता. या प्रकरणात मंडळाधिकारी गणेश लोखंडे यांनी भिल्ल समाजाच्या अंत्यविधी करण्याच्या जागा मागणीचा प्रस्ताव मार्च २०१९ मध्येच तहसिलदार यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती लोंखडे यांनी बोलतांना दिली.