विजयराज बोधनकर
निसर्गाने प्रत्येक माणसाला कवटी नावाचं कपाट दिलंय. त्या कवटी नावाच्या कपाटात न संपणाऱ्या कोºया वह्या नियतीने जन्मासोबतच पाठवून दिल्यात. त्या कपाटातल्या कोºया वह्यांवर ज्ञानाने, कर्माने, अनुभवाने ज्याने ज्याने उत्तम लिहून काढलं आणि त्याचा आयुष्यात वापर केला, त्या अनुभवी ज्ञानाचा उपयोग करून नाव मिळवलं, संपत्ती मिळविली आणि जगालाच पुन्हा ज्ञानरूपाने परतही केलं, त्या त्या माणसांचं जगणं सफल झालं आणि त्याच कपाटातल्या अनेक कोºया वह्यांना आपण मेंदू म्हणतो. याउलट ज्यांनी जन्माला येऊन कपाटातल्या मेंदू नामक वह्या कोºयाच ठेवल्यात ते केवळ आणि केवळ दुर्दैवीच ठरलेत. या कवटी नामक कपाटाला साफसूफ केलं नाही तर दारिद्र्याचे जाळे, जळमटे लागतात, त्यातून उग्रता प्रकटू लागते, वह्यांना वाळवी लागते. मग वाळवी लागलेल्या मेंदूनामक वह्या क्षीण होत जातात, अपयशाला कवटाळून बसतात. दुर्दैवी जगण्याच्या चिखलात हळूहळू रूतत जातात. असे होऊ नये म्हणून अनेक जागृत माणसे त्या कपाटातल्या वह्यांची साफसफाई करतात. अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात. कपाटातली प्रत्येक वही कोरीच असते, त्यावर आपण जे लिहू त्याला नियती तथास्तू म्हणत असते. मग उत्तम असेल तर उत्तम घडत जातं. अशुभ असेल तर अशुभच घडत जातं. प्रत्येकाने मात्र हेच ठरवायचं की नेमकं आपण लिहायचं तरी काय? कवटीतल्या वह्यांवर दुर्योधनाने क्रोधाच्या, मत्सराच्या, लोभाच्या कविता लिहिल्यात, रावणाने अहंकाराच्या, कामवासनेच्या कविता लिहिल्यात, कंसाने सिंहासनासाठी हत्येच्या कविता लिहिल्यात, नियतीने त्यांना अडवलं नाही. त्यांचा शेवट तसाच होऊ दिला. आपलाही शेवट कसा असावा हे फक्त आपणच ठरवू शकतो.