स्नेहलता देशमुख
माघ महिन्यात शेवटी शेवटी कोरोनाने हळूच महाराष्ट्रात शिरकाव केला आणि हळूहळू चंचूप्रवेश करून फाल्गुन महिन्याच्या अमावास्येला त्याने रौद्ररुप धारण केले. सर्व मानवजातीला चांगलीच ठोकर बसली. हा व्हायरस शरीरात कुठून प्रवेश करतो याबद्दल नक्की माहिती उपलब्ध करून त्यावर काय उपाययोजना करायची यावर अभ्यास सुरू झाला. डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार यांच्यावर ताण पडू लागला. हा व्हायरस अत्यंत सूक्ष्म व शरीराला घातक ठरला, यावर कुठलेही असे ठोस उपाय सापडत नव्हते. आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर तग धरता येईल व हा संसर्ग कोरोनामुळे होतो हे नक्की झाले. त्याचे नामकरण झाले कोविड-१९. रुग्णालये भरू लागली व आपल्या राज्यकर्त्यांनी फाल्गुन अमावास्येला लॉकडाऊन जाहीर केला.
प्रत्येकाने आपल्या घरीच राहावे. गर्दी करू नये. हात, पाय साबणाने स्वच्छ धुतले तर प्रसार थांबवता येईल. आपल्या फुफ्फुसावर परिणाम करणारा हा छोटा जंतू नाकावाटे घशातून प्रवेश करतो. कुठल्याही औषधाने त्याची व्याप्ती थांबवता येत नाही. संशोधन प्रचंड वेगाने सुरू आहे. आपण सर्वच काळोखात चाचपडतोय. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता सकस अन्न, प्रसन्न मन, ध्यानधारणा, हलकासा व्यायाम हे उपयोगी पडते. काळजीचा काळोख दूर करून प्रसन्न मन ठेवले तर मात्र फरक पडेल. तंदुरुस्त तन, मनमिळावू मन व धवल धन ही त्रिसूत्री पाळूया आणि कोरोनाचा शिरकाव टाळूया. घरी राहू रोगप्रतिकार शक्ती वाढवू, आनंदी राहू. एकमेका सहाय्य करु, अवघे धरू सुपंथ. कोरोनावर प्रभावी औषध लवकर उपलब्ध होवो, ही प्रार्थना. मोठ्या संकटातून जाताना ‘ओम द्रां चिरंजीवने नसू’ हा मंत्र म्हणतात. घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हटल्याने मन:शांती मिळते व मंत्रोच्चाराने मनावर चांगला परिणाम होतो.
श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मा पाहो देवाधिदेव,भावग्राहय क्लेशहारिन्सुकीर्ते घोरात्कष्यल उद्धरास्मा नमस्ते।