अविद्येचा मळ गेल्याशिवाय देहास पावित्र्य प्राप्त होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:55 PM2019-09-07T18:55:54+5:302019-09-07T18:58:46+5:30

तोपर्यंत कितीही गंगा स्नान केले तरी काय उपयोग?

The body does not attain sanctity until the negativity is gone | अविद्येचा मळ गेल्याशिवाय देहास पावित्र्य प्राप्त होत नाही

अविद्येचा मळ गेल्याशिवाय देहास पावित्र्य प्राप्त होत नाही

googlenewsNext

- हभप भरतबुवा रामदासी, बीड

संतांचे वर्णन करतांना शास्त्रकार म्हणतात, त्यांच्या ठिकाणी शुचित्व आहे, दातृत्व आहे, मातेची ममता आहे. महत्प्रयासाने प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक व्हावे ही तळमळ आहे. संत अवतीर्ण होतात ते जड जीवाच्या कल्याणासाठी. 
येथे उपकारासाठी! आले घर ज्या वैकुंठी  !!
मनुष्य संसारात जन्माला आला की त्याच्या ठिकाणी देह तादात्म्य निर्माण होते.  मी देह आहे, या स्फुरणामुळेच अपवित्रपणा निर्माण होतो. मी देह आहे, या अविद्येचा नाश होऊन मी ब्रह्म आहे, या स्वरूप स्थितीची जाणीव झाली की देह शुद्ध झाला. संत म्हणतात; 
देह शुद्ध करोनी ! भजनी भजावे !!
आणिकाचे नाठवावे गुण दोष!!

संतांच्या संदर्भात संताचा देह पवित्र का. .? तर देह म्हणजेच मी, व मी ब्रह्म आहे, हा त्यांचा अभिमान गळून पडलेला असतो. देहाचा ही अभिमान नाही व ब्रह्मास्मिचा ही अभिमान नाही. फक्त संत निरंजन स्थितीत जगत असतात. म्हणून तर त्यांच्या ठिकाणी शुचित्व येते. विद्या अविद्या या दोन्ही उपाधीचा त्याग करून निरंजन स्थितीला ते प्राप्त झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात
उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार ! 
काहीच आकार तुम्हा नाही  !!

अशा स्थितीला संत प्राप्त झालेले असतात. त्या मुळेच मिथ्या अभिमानी जीवाला शुचित्व देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. गंगेलाही पवित्र करण्याची अद्भूत शक्ती संताच्या जवळ असते. संत म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच. अहो....इतकच काय. .तीर्थाचेही तीर्थ म्हणजे संत  होय. माउली म्हणतात; 
जयाचे नाव तीर्थरावो ! दर्शने प्रशस्तीसी ठावो  !!
लौकिक गंगेत स्नान करून देह पवित्र होईलही. ..पण पाप करण्याची बुद्धी नष्ट होईलच, असे नाही. अविद्येचा मळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत कितीही वेळा गंगा स्नान केले तरी काय उपयोग. .? संत दर्शनाने तर विद्या आणि अविद्या या दोन्ही मळाचा नाश होतो.  नुसत्या कृपा आशिर्वादाने संत साधकाला संतच करतात. तुकाराम महाराज म्हणतात;  
आपणासारखे करिती तात्काळ! 
नाही काळ वेळ तयालागी !!

आज चंगळवादाच्या बाजारात असे शुचित्व असणारे संत मिळणे अवघड आहे. आज तर अध्यात्म क्षेत्राचाही बाजार भरला जात आहे. समाजाला ही विवेकाची भान राहिले नाही. वरवरच्या भपकेपणाला भुलून आज माणसे नको त्याच्या नादी लागतात. अर्थात आज आत्मज्ञान तरी कुणाला हवे आहे. ..? ज्याला त्याला प्रापंचिक अडचणीतून मुक्त करणारे, जादुटोणा चमत्कार करणारे, नोकरी लाऊन देणारे, लग्न जमविणारे, लॉकेट अंगठ्या हवेतून काढून देणारे व भरपूर पैसा लुटणारे महाराज समाजाला हवे आहेत. समाज अशाच महाराजांच्या शोधात असतो 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

Web Title: The body does not attain sanctity until the negativity is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.