चिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:57 AM2018-06-08T01:57:42+5:302018-06-08T01:57:42+5:30
एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो.
- प्रा. डॉ. संदीप ताटेवार
एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो. देवाचे चिंतन केले तर दैवीगुण म्हणजे प्रेम, आनंद, मौन, शांती या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात. राक्षसाचे चिंतन केल्यास क्र ोध, हव्यास, अहंकार, मत्सर या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात म्हणूनच परमेश्वराचे चिंतन आपल्याला जीवनाच्या भवसागरातून सुखरूप पार पाडत असते. कोणत्याही परिस्थिती मध्ये आपण केलेला पाहिला विचार महत्त्वाचा ठरतो कारण त्यानंतरची विचारांची शृखंला त्याप्रमाणे निर्माण होते.
जेव्हा पाहिला विचार सकारात्मक असतो तेव्हा त्यानंतरचे चिंतन सकारात्मकच होत जात असते व माझं चांगलं होणार हा भाव आपल्या बाह्यमनातून अंतर्मनात मूळ धरून बसतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्याचे आपण चिंतन करायला पाहिजे. जेव्हा आपला भूतकाळ चांगला नसतो, वर्तमानकाळ सुद्धा चांगला नसतो तेव्हा माझा भविष्यकाळ कसा चांगला राहील याचे चिंतन महत्त्वाचे ठरते. चिंतनाचे प्रमाण, त्याची तीव्रता व त्याचा दर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे यावर आपले भविष्य अवलंबून असते. अध्यात्मामधील निसर्ग नियम सांगतो की ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी निसर्गाकडे विचारामार्फत परावर्तीत होत असतात व जेव्हा त्या निसर्गाकडे पोहचतात, तेव्हा निसर्ग त्याला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे चिंतन हे सजगपणे करायला पाहिजे. जेव्हा आपण वारंवार एखाद्या गोष्टीचे चिंतन करतो तेव्हा ती आपल्या अंतर्मनात रुजते व त्याप्रमाणे आपल्या जीवनात गोष्टी घडत जातात.
चिंतन हे परिस्थितीचे न करता त्यावरील उपायाचे करायला पाहिजे म्हणजेच परिस्थितीवर मात करता येते; मात्र बरेचदा आपण आपली शक्ती ही परिस्थितीचे चिंतन करण्यात व त्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात घालवितो व त्यामध्ये आपली आत्मिक शिक्त खर्ची पडते. त्यामुळे आपण परिस्थितीसमोर दुर्बल होतो व त्यावर मात करू शकत नाही. चिंतन चांगल्या गोष्टीचे करायचे की वाईट गोष्टीचे हा विकल्प आपल्यालाच ठरवायचा असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की, जसे तुम्ही चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल; दुबळे किंवा तेजस्वी!.