पहिली कला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 05:41 AM2020-01-03T05:41:42+5:302020-01-03T05:43:01+5:30
अध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते.
- विजयराज बोधनकर
अध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. शब्द सुर हा निसर्गाने मानवाला दिलेला मोठा आशीर्वाद आहे. अक्षरज्ञान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. ज्याला अक्षरज्ञान झाले, तो शब्दांवर प्रभुत्व मिळवू शकतो. जो विचार करून बोलतो तो विचारवंत ठरतो. जो बोलून विचारात पडतो तो हळूहळू जगाला आणि स्वत:ला अप्रिय वाटत राहतो. तारतम्य नावाची एक जाणीव असते. ती जाणीवसुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक शक्तीच आहे. तुमच्या उत्तम बोलण्याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की, उत्तम समाज आपोआप त्या व्यक्तीशी जोडला जातो. उत्तम बोलण्याची कला ही आत्मसात करावी लागते. त्यासाठी फक्त रसाळ वाणी असून चालत नाही, तर जागतिक ज्ञान आणि वेगळा विचार करण्याची ऊर्जाही असली पाहिजे. मेंदूतून उत्पन्न होणारे विचार धन-मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतात. मन स्थिर असेल तरच मेंदूच्या ऊर्जाक्षेत्रातून नवा विचार प्रकटू शकतो आणि त्याच नव्या विचारांची मांडणी जगासमोर मांडताना उत्तम संवादाची कला त्या बोलणाऱ्या व्यक्तीला यश प्राप्त करून देऊ शकते. अनेकांना साधे बोलणेही न जमण्याचे कारण म्हणजे ते बोलण्याचा सराव करीत नाहीत. कुठलीही गोष्ट पहिली आत्मचिंतनाच्या पायरीवरून प्रवास करती झाली की तिला मेंदूचा भक्कम आधार मिळतो. मेंदूच्या कपाटात एखादी गोष्ट घर करून बसली की, ती डळमळीत होण्याची भीती नसते. बोलण्याचा सराव मेंदूच्या माध्यमातून केला तर चंचल मनही स्थिर होऊ शकते. उत्तम बोलण्याच्या कलेतून प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतात. जागतिक वैचारिक बळ वाढत जाते. माणूस बोलण्याच्या कलेमुळे अधिक प्रगल्भ होत जातो. माणसे जिंकण्यासाठी गोड शब्द पुरेसा असतो. एकदा का केवळ बोलण्यातून जग जिंकता आले की, मग ईश्वरी शक्ती आपल्या सोबत असते.