संकल्पशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:51 AM2020-06-06T05:51:28+5:302020-06-06T05:51:35+5:30
नीता ब्रह्माकुमारी १९१०मध्ये वैज्ञानिकांचा ग्रुप उत्तर ध्रुवावर संशोधनासाठी गेला होता. जहाजात ३५-४० लोक होते. प्रवासात कडाक्याच्या थंडीमुळे तयार झालेल्या ...
नीता ब्रह्माकुमारी
१९१०मध्ये वैज्ञानिकांचा ग्रुप उत्तर ध्रुवावर संशोधनासाठी गेला होता. जहाजात ३५-४० लोक होते. प्रवासात कडाक्याच्या थंडीमुळे तयार झालेल्या बर्फात जहाज अडकते. कॅप्टननं सांगितलं, हे जहाज पुन्हा मार्गी लागायला तीन महिने लागतील. सर्व सोयी जहाजावर होत्या; पण जहाजातील लोकांना सिगारेटचे व्यसन होते. त्याचा साठा संपायला लागला. सर्वांच्या मनात प्रश्न उभारला, ही सिगारेट संपले तर आपले काय? तीन महिने कसे काढायचे? त्यांनी जहाजावरील कागद, कपडे जाळायला सुरू केले. त्या धुराने ते सिगारेटची इच्छा पुरी करू लागले. हे जेव्हा कॅप्टनच्या कानावर पडले, तेव्हा तो त्यास नकार देतो; पण ते म्हणाले, ‘खायला नाही मिळाले तरी चालेल; पण सिगारेट हवीच.’ कॅप्टन विचारात पडतो, असे केले तर कसे होणार? कारण जहाजावरचे दोरखंडही जळायला लागले होते. अशा परिस्थितीतून ते कसे बाहेर पडले व आपल्या स्थानी पोहोचले, याचा वृत्तांत कॅप्टनने वृत्तपत्रात लिहिला. हा वृत्तांत वाचताना अमेरिकेतील चेन स्मोकर स्टुवर्ड पॅरीच्या मनात आले, मी या जहाजावर असतो तर माझीही अशीच अवस्था असती का? कारण त्याने कित्येक वेळा हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता; परंतु यश आले नव्हते. जेव्हा त्याने स्वत:ला तेथे बघितले व विचार केला तेव्हा मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्याने ईश्वराला सांगितले, तू ह्या जगात आहेस व तुझा माझ्यावर विश्वास असेल, तर आता सिगारेट ओढण्याचे सोडतो; पण जेव्हा हा विश्वास संपेल तेव्हा हीच सिगारेट पुन्हा माझ्या हातात असेल. पॅरी सांगतो की, ३० वर्षे झाली, आजही ती अर्धी सिगारेट अॅश ट्रेत आहे. ह्या काळात कितीतरी प्रसंग आले; पण त्या सिगारेटला हात लावला नाही. हे कसे घडले? मानवी मन अद्भुत शक्तींनी भरलेय; पण आपण त्या शक्तींचा वापर करीत नाही. विचार करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे; पण त्या विचारांत शक्ती असणे महत्त्वाचे. संकल्पामध्ये दृढता असेल, त्या संकल्पाला वास्तवात आणण्याची चिकाटी असेल तर सर्व काही साध्य आहे.