- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
धर्म म्हणजे काय..? धर्म का हवा..? आजच्या प्रगतीच्या काळात धर्माची खरंच गरज आहे का..? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आजच्या लेखमालेत आपण या प्रश्नांवर थोडे चिंतन करु यात. महाभारतकार धर्माची व्याख्या करतांना म्हणतात -धारणात् धर्म इत्याहु: । धर्मो धारयते: प्रजा: ॥यस्यात् धारण संयुक्त:। सधर्म: इति निश्चय: ॥ज्यायोगे प्रजेची धारणा होते, त्याला धर्म म्हणा. आता आपण म्हणाल, धारणा म्हणजे काय..? तर धारणा म्हणजे व्यवस्था. व्यवस्था म्हणजे नियम, नियम म्हणजे विधी आणि निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा आणि निषेध म्हणजे हे करु नका अशी आज्ञा. अशी विधीनिषेधात्मक जीवन जगण्याची जी घटना त्याला धर्म म्हणावे. देश चालावा म्हणून जशी घटनेची गरज असते तसे मानवी जीवन समृद्ध व सुखी होण्यासाठी धर्म नावाच्या घटनेची नितांत गरज आहे. धर्म आम्हाला नीती शिकवतो मग नीतीशिवाय जीवन असते का.? तात्पर्य काय तर नीती म्हणजेच धर्म. अध्यात्माच्या मार्गानेच हा जीवन प्रवास सुखकर होईल. जर या नीतिरथाची चाके विवेक आणि संयम असतील तर कधीच अपघात होणार नाही. धर्म हा सारथी असावा. पुरु षार्थ हे घोडे असावेत. भक्ती हा लगाम असावा आणि ईश्वरश्रद्धा हा ब्रेक असावा, मगच जीवनाचा रथ हा योग्य मार्गाने जाईल.
आज धर्मग्लानीचा काळ आहे. वाढत्या चंगळवादाने आमचे जीवन जगण्याचे संदर्भच बदलले आहेत. आम्हाला धर्म म्हणजे अफूची गोळी आहे असे वाटते. धर्म जीवनाची व्यवस्था आहे. धर्म नको वाटणं म्हणजे व्यवस्था अमान्य केल्यासारखे आहे. आम्हाला विकारविवशतेने ग्रासले आहे. धर्मग्लानी हा मधुमेह तर विषयासक्ती हा रक्तदाब (ब्लडप्रेशर) आहे. या दोन व्याधींनी ज्यांना ग्रासले आहे, त्यांना धर्माच्या अतिदक्षता विभागात ठेवले पाहिजे. धर्म तर गंगाजलासारखा पवित्र आहे. आपण फक्त कर्म कांडालाच धर्म समजतो. माझे प्रत्येक कर्म हे ईश्वराला आवडणारे असले पाहिजे, हे धर्मच सांगतो. धर्माची व्याप्ती खूप व्यापक आहे, फक्त देवळातले कर्म म्हणजेच धर्म नाही. तो धर्मशास्त्रा अंतर्गत छोटासा भाग आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, संडासपासून ते राजसिंहासनापर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढे कर्म आम्ही करतो तेवढे कर्म म्हणजे धर्म होय. सुरांशिवाय संगीत असते का.? पाण्याशिवाय नदी असते का.? सुगंधाशिवाय फुले असतात का.? अगदी तसं आणि तसंच धर्माशिवाय माणसाचे जीवन असते का..? समाज धारणेसाठी धर्माची नितांत गरज आहे. धर्म कधी हिंसा, द्वेष, मत्सर, असूया, वैरभाव करायला शिकवत नाही. धर्म तर मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता, बंधुता, एकता, या जीवन मूल्यांची शिकवण देतो, म्हणून धर्म हवा आहे.
(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.मोबाईल क्र. 9421344960 )