जीवन जगताना सत्कर्म करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:01 PM2019-07-26T12:01:37+5:302019-07-26T12:01:57+5:30
चातुर्मास विशेष...
सोलापूर : मनुष्य मेला की तो स्वर्गात गेला की नरकात गेला हे त्याच्या अंत्ययात्रेला आलेले लोक मागे त्याच्याविषयी बोलतात यावरुन समजते, असे प्रतिपादन प.पू. गौतममुनी म. सा. यांनी केले.
याविषयी एक विनोदी किस्सा सांगून ते म्हणाले, नरकात कुणालाच जाण्याची ईच्छा नसते, प्रत्येकाला स्वर्गच हवा असतो. यासाठी पृथ्वीतलावर जीवन जगताना सत्कर्म करावे. दुष्टकर्म, दुराचार आपल्या मन, वचन व वाणीतून करणे हे चुकीचे आहे. माणूस चांगला वागला की अंत्ययात्रेत मागे चालणारे लोक चांगलेच बोलतात. सध्या जगण्याच्या पद्धतीत बदल होत असून याबद्दल ते म्हणाले, अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. आज मात्र, सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत. कुत्र्यापासून सावधान अशा पाट्या आपल्यांना पाहायला मिळतात.
स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जीवन कार्याचा त्यांनी दाखला दिला. सद्गुरु हे आपले जीवन सार्थक बनवतात. सज्जनांच्या सहवासात जीवन सद्गुणांनी सजवा. जीवनात जगण्याची कला गुरु आपणास शिकवतात. आपण देवाला पाहू शकलो नाही तरी संत, गुरु हे साक्षात परमात्माच असतात. गुरु नाही तर जीवन सुरु नाही. म्हणून प्रत्येकाने सत्संग, प्रवचनाच्या श्रवणाने संतांकडून शिकावे. संतांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत हे आपल्यांना परमात्याची भेट घडवितात. नरक हा शब्द उलटा करन असा होतो. कर्णासारखे दानी व्हायला हवे. कारण दानाचे मोठे महत्त्व आहे. दान हा असा शब्द आहे की जो नरकाचे दार बंद करतोे, असेही गौतममुनी यांनी सांगितले.