- प्रा. शिवाजीराव भुकेलेजातीपातीच्या मगरमिठीत अडकलेल्या भारतीय समाजाची या मगरमिठीतून मुक्तता करून किमान पारमार्थिक क्षेत्रात तरी आध्यात्मिक लोकशाहीचं ताबडं फुटावं म्हणून कर्नाटकात बसवेश्वरांनी, उत्तरेत संत कबीर, रोहिदासांनी, पंजाबात गुुरुनानकांनी, महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, चोखोबा, तुकोबा आदी प्रांतोप्रांतीच्या संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि समाजजीवनात आत्मजाणिवेची नवी पहाट उजाडली. शिक्षणाचा प्रसार, पुरोगामी परंपरा, आधुनिकतेची कास या सगळ्याचा परिपाक म्हणून संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे अभिप्रेत होते. परंतु, आम्ही हुशार भारतीय माणसांनी जे युगप्रवर्तक संत जात आणि वर्णव्यवस्थेची उतरंड नष्ट करण्यासाठी आले, त्यांनाच जाती आणि वर्णाच्या चौकटीत बसविले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावाने जाती-जातीत आणि प्रांता-प्रांतात खूप मोठा संघर्ष निर्माण झाला. कुठल्याही लाभ-लोभावाचून साऱ्या जगावर निष्काम भावनेने प्रेम करावे आणि सर्व जाती-धर्मांत आनंदाचे आवार मांडावे हीच साधुसंतांची खरी जात. आपल्या आयुष्यातील अधिकाधिक दिवस जातिव्यवस्थेच्या उतरंडीला नष्ट करण्यासाठी साधुसंतांना खर्ची घालावे लागले आणि त्यानंतर अध्यात्मविद्येचा दीप घरोघरी उजळावा लागला. संत कबिराला तर जातीबरोबरच औरस-अनौरस या बेगडी उत्पत्तीबरोबरही प्रचंड संघर्ष करावा लागला. तेव्हा संत कबिराने जातीच्या बाह्यरूपाचे खंडन करताना म्हटले होते -जाति न पूछो साधु की, पूढ लिजिए ज्ञानमोल करों तलवार का, पडा रहनें दो म्यान ।साधुसंतांचे मोठेपण तो कुठल्या जातीत जन्माला आला यावरून ठरू नये, तर त्याच्या डोक्यातील ज्ञान आणि कर्मातील महानतेवरून ठरविण्यात यावे, यासाठी संत कबिराने खूपच सुंदर दृष्टांत दिला आहे. एखाद्या तलवारीची म्यान हिरे, माणिके, रत्नाने सजविलेली असली, पण आतली तलवार जर गंजलेली असेल तर सुंदर म्यानाचा काहीच उपयोग नाही; तद्वतच जातीय अभिनिवेशाच्या नावाखाली एखाद्याकडे साधुत्व चालत आले, पण डोक्यात भाव-भक्ती, कर्म, समता, ममता यापैकी कुठलाच विचार नसेल तर त्यांचा काहीच उपयोग नाही. इकडे महाराष्ट्रातही ज्ञानोबा, तुकोबांनी‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मभेदा-भेद अमंगल’चा समतावादाचा उद्घोष केला. चातुवर्ण्य व्यवस्था जरी त्यांना समूळ नष्ट करता आली नाही, तरी या व्यवस्थेला खिळखिळीत करण्याचे प्रयत्न मात्र भारतातील सर्वच संतांनी केले. पण त्यांचे निरामय, निराभिमानी, जातीरहित, वर्णरहित समाजव्यवस्थेचे स्वप्न आम्हास पचलेच नाही. मानवतेची खरी शिकवण आम्हाला समजलीच नाही. खरा देव कुठे असतो, याचा विचार कधी आम्ही केला नाही. माणसात देव पाहा, या संतांच्या शिकवणीचा सगळ्यांना विसर पडला. कुणीही अनोळखी व्यक्ती भेटली की आधी तो कोणत्या जातीचा या प्रश्नाची भुणभुण डोक्यात सुरू होते. त्यावरून मग पुढील आडाखे बांधले जातात. जग पुढे जात असताना आम्ही मात्र असे मागेमागे जात आहोत. जातिवादाच्या हरळीचे मूळ आजच्या ग्लोबल इंडियामध्येसुद्धा एवढे हिरवेगार आणि ताजे टवटवीत आहे की आम्ही माणसाकडे माणूस म्हणून पाहतच नाही, तर जात हीच माणसाची खरी ‘आयडेंटी’ झाली आहे. जातीसाठी जन्मणे, जातीसाठी भांडणे, जाती-जातीत होळी पेटवून आपली पोळी भाजून घेणे हाच आमचा जीवन धर्म झाला आहे. जातीसाठी खावी माती, हे म्हणताना वैषम्य वाटण्याऐवजी अभिमान वाटू लागतो, हे खरे दुर्दैव.
जात विचारू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 6:14 AM