भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा सुरु झाली असून भाविकांची मोठी गर्दी या यात्रेला बघायला मिळत आहे. ही यात्रा सुरू होऊन आता तीन दिवस लोटले आहेत. जगन्नाथ रथ यात्रेत शेकडो भाविक सामिल होतात. या यात्रेतील रथ ओढायला मिळणं हे भाविक आपलं भाग्य समजतात. वर्षानुवर्षे सुरु असलेली ही परंपरा आजही सुरू आहे. चला जाणून घेऊ जगन्नाथ यात्रेच्या काही खास गोष्टी...
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान जगन्नाथ मंदिर हे ८०० वर्षे जुनं आहे. या मंदिराची उंची ५८ मीटर इतकी आहे. मंदिराच्या गर्भालयात भगवान जगन्नाथ, बलभद्र सुभद्रा यांची मूर्ती आहे. अशीही मान्यता आहे की, या मंदिरात येणारा कधीही उपाशी राहत नाही. कारण या मंदिरातील स्वंयपाकघरात निरंतर जेवण बनवणं सरु असतं. हे स्वंयपाक घर जगप्रसिद्ध आहे.
लाकडाची मूर्ती
बहुदा आपण कोणत्याही मंदिरात मूर्ती जेव्हा बघतो तेव्हा त्या एकतर दगडाच्या असतात किंवा संगमरवराच्या असतात. पण जगन्नाथ मंदिराची खासियत म्हणजे या मंदिरातील देवांच्या मूर्ती या लाकडापासून तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती लाकडाच्या का आहेत यामागे काही आख्यायिका आहेत.
काय आहे आख्यायिका?
असे म्हणतात की, राजा इंद्रधुम्न एकदा स्वप्नात नीलांचल पर्वतावरील नीलामाधव देवाच्या दर्शनासाठी गेले. त्यांना देवाच्या दर्शनाची अपेक्षा होती. तिथे एक आकाशवाणी झाली की, राजाला लाकडाचा देव भगवान जगन्नाथचं दर्शन होईल. याच कारणाने समुद्रात मिळालेल्या लाकडाच्या एका मोठ्या तुकड्यापासून देवतांच्या मूर्ती तयार करण्यासाठी शिल्पकार विश्वकर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
मूर्तीकाराने ठेवली होती अट
विश्वकर्मा यांनी एक अट ठेवली होती की, जेव्हा ते मूर्तींचं निर्माण करतील तेव्हा त्यांना कुणीही पाहू नये. पण राजा विश्वकर्मा यांचा हा नियम मोडून मूर्तीचं निर्माण होत असताना तिथे गेले. जेव्हा ही बाब विश्वकर्मा यांना कळाली तेव्हा ते मूर्तींचं काम अर्धवट सोडून गेले. तेव्हापासून या मंदिरातील अर्धवट मूर्तींचीच पूजा केली जाते.