स्वप्न ज्ञानेशांचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:38 AM2019-03-18T06:38:47+5:302019-03-18T06:39:01+5:30
भावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
भावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले. नऊ हजारांहून अधिक ओव्यांचे आपले देशीकार लेणे महालया नाम नेवासे ग्रासी पूर्णत्वास गेले तेव्हा ज्ञानदेवासारख्या आनंदयोग्याने विश्वात्मक परमेश्वरी शक्ती व विश्वगुरू संत निवृत्तीनाथांच्याकडे पसायदान मागितले. मुळात पसायदान हे उपेक्षितांचा म्होरक्या संत ज्ञानोबा माउलीने विश्वाला कवेत घेणारे भव्य-दिव्य स्वप्न आहे. दु:ख गिळून गोविंदाचे गीत गाण्याची सहनशीलता व्यक्तिमत्त्वामध्ये मुरावी लागते तेव्हा कोठे म्हणता येते-
आता विश्वात्मके देवें। येणे वागयज्ञे तोशावें।
तोशोनी मज द्यावें। पसायदान हे।।
आपल्या अन्तवृत्तीला उर्ध्वगामी करणारी भव्य-दिव्य स्पप्ने पाहणे हा तर माणसाचा स्थायीभाव आहे; परंतु या स्वप्नाला वैयक्तिक द्वेशाच्या इंगळीने कडाडून चावा घेऊ नये. एकदा की या इंगळीने चावा घेतला की स्वप्ने सापासारखी जमिनीवरूनच सरपटू लागतात. त्यांना मुक्ततेचे नभांगण कधी खुणावतच नाही. वैयक्तिक स्वप्नांच्या भोवतीने वैयक्तिक स्वार्थ जेव्हा पिंगा घालू लागतो, तेव्हा आपल्या पलीकडील जग धुसर वाटायला लागले. ज्ञानवंत मात्र ‘स्व’चे विसर्जन करून ‘समष्टीच्या’ कल्याणाचे स्वप्न पाहतात. त्यांच्या मनीचा स्वप्नरूपी पक्षीराज सारे विश्व आनंदाने बहारून जावुं रे अशी गगनाला स्पर्श करणारी स्वप्ने पाहतात. तसे पाहिले तर जन्मापासूनच्या उपेक्षा वाटायला आलेल्या ज्ञानदेवांनी पसायदानाच्या रूपाने पाहिलेले स्वप्न साऱ्या कुंपणापलीकडे भरारी घेण्याचे काम करते.