आनंद अनुभवा विश्वास अन् श्रद्धेतून!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:35 PM2019-04-16T18:35:52+5:302019-04-16T18:37:15+5:30
आनंदाकडे पोहोचण्याचा, नव्हे आनंदाला अनुभवण्याचा एक मार्ग विश्वासातून, श्रद्धेतून जातो
- रमेश सप्रे
अवंतीपूरचा राजा विक्रमसेन आणि प्रधान इंद्रसेन दोघांतील संबंध अगदी राम-लक्ष्मणांसारखे. विक्रमसेनाचा आपल्या प्रधानावर पूर्ण विश्वास होता. स्वत:पेक्षा अधिक विश्वास प्रधानावर होता असं म्हटलं तरी चालेल.
लागोपाठ तीन वर्षं पाऊस पडला नव्हता. अन्न पाण्याशिवाय सारे प्राणी-माणसं तडफडत होती. विक्रमसेनाला ही दुष्काळामुळे झालेली प्रजेची दुर्दशा पाहावेना. म्हणून इंद्रसेनाबरोबर एका रात्री तो राज्य सोडून निघाला. कुणालाही कळू नये म्हणून त्यांनी साधे कपडे घातले होते. तलवार मात्र दोघांकडेही होती. रात्रभर रानातून चालल्यामुळे दोघेही थकले. इंद्रसेन राजाला म्हणाला, ‘महाराज, या वृक्षाखाली तुम्ही झोपा मी जागून जंगली जनावरांपासून आपलं रक्षण करीन.’ राजाला केव्हा गाढ झोप लागली ते त्यालाही कळलं नाही. प्रधान इंद्रसेन हा संतप्रवृत्तीचा होता. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा त्याचा जिवंत अनुभव होता. त्याला पक्ष्यांची बोली कळायची. पहाट होत आल्यानं पक्षी जागे झाले व किलबिलू लागले. ज्या झाडाखाली राजा नि प्रधान विश्रांती घेत होते, त्या झाडावर पक्ष्यांचं एक जोडपं येऊन बसलं. त्यांना दुष्काळी परिस्थितीपुढे अगतिक होऊन राजा-प्रधान दूर चाललेयत याची कल्पना होती.
पक्षिणी म्हणाली, ‘मला या देवासमान राजाची मन:स्थिती पाहून दु:ख होतं.’ यावर तो पक्षी उद्गारला, ‘अगं, पण यावर उपाय आहे. तुला समोर जे कोरडं तळं दिसतंय ना? राजाचा गळा चिरून त्यातलं रक्त जर तळ्यात सगळीकडे शिंपडलं तर क्षणात सारे झरे वाहू लागून काही वेळातच तळं पाण्यानं तुडुंब भरेल. मग त्याचं पाणी पाट खणून अवंतीपूरला नेलं की सारेच प्रश्न सुटतील.
‘पण हे करणार कोण? त्यांना कळणार तरी कसं? पण यात राजाचे प्राण जातील ना? या पक्षिणीच्या प्रश्नावर पक्ष्याचं उत्तर स्पष्ट होतं. ‘याच तळ्याच्या पलिकडच्या काठावर गोल पानांची वनस्पती आहे त्या पानांचा रस पिळला तर राजाच्या गळ्याची जखम बरी होऊन तो पूर्ववत होईल नि तळं पाण्यानं भरल्यामुळे सारे प्रश्न सुटतील.’
हा संवाद प्रधान इंद्रसेनानं संपूर्ण ऐकला. राजा गाढ झोपलाय हे पाहून तो त्या कोरडय़ा सरोवराच्या दुस-या तिरावर जातो. पाहतो तर तिथं खरंच गोल पानांच्या वनस्पती असतात. तलवारीनं तो आपलं बोट कापतो, रक्ताची धार लागते लगेच त्या गोल पानाचा रस लावल्यावर रक्त तर थांबतंच. पण बोटही अगदी पूर्वीसारखं होतं. म्हणजे त्या पक्ष्याचं म्हणणं खरं होतं तर! लगेच तो राजाजवळ येतो. त्याच्या छातीवर बसतो. त्यापूर्वी त्यानं पानांच्या एका द्रोणातून भरभूर गोल पानांचा रस काढून आणलेला असतो. छातीवर इंद्रसेनाला बसलेलं जाणवून राजानं डोळे उघडले. कोणताही प्रतिकार न करता तो शांतपणे पडून राहिला. नंतर इंद्रसेनानं तलवारीनं राजाचा गळा चिरला. रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. पसाभर रक्त घेऊन इंद्रसेनानं त्या सुक्या तळ्यात ठिकठिकाणी शिंपडलं. नंतर धावत येऊन बेशुद्ध पडलेल्या राजाच्या गळ्याला तो किमयागार रस लावला. काही क्षणातच राजा पूर्ववत झाला. त्यानं कोणताही प्रश्न प्रधानाला विचारला नाही. नंतर दोघं मागं वळून पाहतात तो काय अनेक ठिकाणी झरे फुटून ते तळं भरू लागलं होतं पाण्यानं. दोघंही आनंदानं राज्यात परतले. अनेक लोकांनी कुदळी, फावडी घेऊन त्या तळ्याच्या काठापासून अवंतीपुरापर्यंत पाट खणले. सगळीकडे पाणी पोहोचलं. काळाच्या ओघात पिकं शेतात डोलू लागली. पुन्हा अवंतीपूर आबादी आबाद झालं. सारी प्रजा व राज्य आनंदानं ओतप्रोत भरून गेलं.
या सर्व काळात प्रधान इंद्रसेन मात्र एका गोष्टीनं अस्वस्थ होता. इतकं सगळं घडून राजा, प्राणावरच्या संकटातून बाहेर पडून सुद्धा एकदाही त्यानं आपल्याला त्या विषयी एकही प्रश्न कसा विचारला नाही? त्याची ती बेचैनी पाहून एकदा विक्रमसेनानंच त्याला विचारलं, ‘कोणत्याही विचारामुळे तू अस्वस्थ आहेस का?’ यावर इंद्रसेनानं आपल्या मनातल्या खळबळीचं कारण सांगितलं. यावर हसून राजा म्हणाला, ‘एवढंच होय, त्यात काय विचारायचं म्हणून मी विचारलं नाही. कारण तू करशील ते माझ्या नि सर्वाच्या कल्याणाचंच करशील यावर माझा ठाम विश्वास आहे. तू मला ठार जरी मारलं असतंस तरी ते माझ्या हितासाठीच असणार होतं. याबद्दल माझ्या मनात किंचितही संशय नाही.’ यावर इंद्रसेन काय बोलणार? क्षणभर पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला.
या कथेतून प्रत्ययाला येणारा पूर्ण विश्वास हा केवळ त्या दोघांच्याच नव्हे तर सा-या प्रजाजनांच्या व राज्यातील पशु, पक्षी, वनस्पती साऱ्यांना आनंद देणाराच होता. खरंच आनंदाकडे पोहोचण्याचा, नव्हे आनंदाला अनुभवण्याचा एक मार्ग विश्वासातून, श्रद्धेतून जातो हे निश्चित!