अधर्माचा अग्नी संगतीत येणाऱ्यालाही बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 07:44 PM2019-08-30T19:44:41+5:302019-08-30T19:52:09+5:30

धर्म भ्रष्ट माणूस कोणीही असो त्याची संगती साधकाला घातकच असते.

The fire of lawlessness is also a deterrent to those who come into the company | अधर्माचा अग्नी संगतीत येणाऱ्यालाही बाधक

अधर्माचा अग्नी संगतीत येणाऱ्यालाही बाधक

Next

- ह.भ.प भरतबुवा रामदासी, बीड

परमार्थाची साधना करीत असतांना साधकाने नेहमी संत संगतीतच राहावे. कधीही दुर्जनाच्या संगतीत राहू नये. दुर्जनाच्या संगतीने मती भ्रष्ट होते. खरं तर, मनुष्य हा संग प्रधान प्राणी आहे. संगतीशिवाय तो राहूच शकत नाही. पण परमार्थात सत्संग खूप गरजेचा आहे. श्रीमद् भागवत ग्रंथात कपिल भगवान देवहुती मातेला उपदेश करतांना दु:संगाचे बाधकत्व सांगताना म्हणतात; 
सत्यं शौचं दया मौनं बुद्धि: श्रीह्रि:यश:क्षमा  !
शमो दमो भगश्चेति यत्संगात अति संक्षयम !!

कपिल भगवान म्हणतात; माते!  दु:संगाने सत्य, पावित्र्य, दया, मनन शिलता, बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मन:शांती इ.गुणांचा नाश होतो. भक्ती मार्गाच्या दृष्टीने दु:संग त्याज्य आहे. कुतर्क,वितंडवादी, अश्रद्ध, रजोगुणी, व नास्तिक माणसाच्या संगतीने माणूस विवेक बुद्धीपासून ढळतो. तुकाराम महाराज म्हणतात; 
नको दुष्ट संग! भजनामध्ये पडे भंग  !!
आपण म्हणाल, दुर्जन आणि सज्जन ओळखावयाचे तरी कसे. ? तर, धर्म बाह्य, शास्त्र बाह्य कर्म करणारा दुर्जन. धर्माचरणाने वागणारा सज्जन. नाथबाबा म्हणाले ;
जो मानी ना वेद शास्त्रार्था ! जो अविश्वासी परमार्था ! ज्या माजी अति विकल्पता! तो ही तत्वता दु:संग !!
धर्म भ्रष्ट, नास्तिक, पाखंडी, मनुष्य आपल्या नात्यातील असला तरी, त्याची संगत करू नका. ...? तुलसीदास म्हणाले-
जिनकू प्रिय न राम वैदेही! त्यजियो ताको कोटी बैरीसम! 
पिता त्यजो प्रल्हाद, बिभीषण बंधु, भरत म्हतारी!!

भागवत भक्त प्रल्हादाने पित्याचा त्याग केला. बिभीषणाने भावाचा त्याग केला. भरताने जन्म दात्या आईचा त्याग केला. बलिराजाने शुक्र ाचार्याचा त्याग केला. धर्म भ्रष्ट माणूस कोणीही असो त्याची संगती साधकाला घातकच असते. महा वैष्णव ज्ञानराज माउली म्हणतात; 
 जैसा घरी आपुला  ! वा निवसे अग्नी लागला ! तो आणि कांही प्रज्वलिला  ! जाळूनि घाली  !!


एका अविचारी माणसाने आपल्या हातानेच घर पेटवले. त्याला विचारले, घर का पेटवलेस. .? तो म्हणाला, माझेच घर आहे. मी काहीही करील. तुम्ही कोण विचारणार. .? बाबारे. ..! घर पेटव पण त्याचा परिणाम तुझ्या शेजारी आम्ही असल्यामुळे आम्हालाही भोगावा लागणार आहे. तात्पर्य काय तर, एकदा का अग्नी प्रज्विलत झाला की तो शेजारचे घर ही जाळून नष्ट करतो. तसे अधर्माचा अग्नी कुणाच्याही मनात निर्माण झाला की तो त्याच्या संगतीत येणाऱ्यालाही बाधक ठरल्याशिवाय राहणार नाही. आज हाता हातावर धर्माचा ऱ्हास करणारी धर्म भ्रष्ट माणसे आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात; 
नको दुष्ट संग! भजनामध्ये पडे भंग!!
 

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

Web Title: The fire of lawlessness is also a deterrent to those who come into the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.