14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे. सर्वांना त्याच्या आगमनाची ओढ लागली असून सध्या सर्वत्र त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी 2 सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून घरोघरी आरास आणि नैवेद्याच्या तयारी सुरू आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी भक्तीभावाने बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. अशातच अनेकांना प्रश्न पडला असेल की, नक्की बाप्पालाच्या प्रतिष्ठापनेचा मूहूर्त काय आहे? आपण जाणून घेऊया गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा मूहूर्त आणि पद्धत...
पूजेचा शुभ मुहूर्त
यावर्षी गणेश चतुर्थी दोन सप्टेंबरला आहे. २ सप्टेंबरच्या दिवशी सकाळी ४.५६ भद्राचा शुभ मुहूर्त आरंभ होणार असून तो मंगळवारी मध्यरात्री १.५३ मिनिटांनी मुहूर्त समाप्ती होणार आहे. गणरायाच्या पूजेचा मुहूर्त सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी १. ४२ मिनिटापर्यंत असणार आहे.
प्रतिष्ठापनेसाठी लागणारं साहित्य:
गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे , गोड पदार्थ.
पूजेसाठी आवश्यक तयारी -
1. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य ती आरास आदल्या दिवशीच करून घ्या. 2. मूर्ती मखरात ठेवून पूजेचं सर्व साहित्य तयार ठेवा. 3. प्रतिष्ठापना करताना देवाला सर्व गोष्टी उजव्या हातानेच अर्पण कराव्यात.
अशा पद्धतीने करा गणरायाची पूजा
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अभंग स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शुभ मुहूर्ताला पूजा सुरू करावी. स्थापन केलेल्या गणपतीच्या प्रतिमेला धूप, पुष्प, दीप, टिळा लावून पूजा करा. पूजा – अर्चा करून झाल्यावर बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवा.