- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)
मागील लेखात आपण भाव म्हणजे काय..? या प्रश्नापर्यंत आलो होतो तर भक्तीरसायन सिंधुकार भावाची व्याख्या करतांना म्हणतात -
प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः ।शुद्धसत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांशु साम्यभाक् ।रुचिभिश्चित्त मासृण्य कृदसौ भाव उच्यते ॥
प्रेम ही भावाची पहिली अवस्था. भाव म्हणजे प्रेम..!अंतःकरणांत शुद्धसत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे.प्रेमरुपी सूर्याच्या किरणाप्रमाणे, भगवद्भक्तीच्या तीव्र अभिलाषेने, चित्तात उत्पन्न झालेली जी आर्द्रता, जो स्नेह, जे प्रेम, त्या प्रेमालाच 'भाव' असे म्हणतात. तात्पर्य, भाव म्हणजे प्रेम..!भगवद्भक्तीत जर प्रेम नसेल तर भक्तीचे फळ मिळणार नाही कारण देव तर फक्त भावानेच, प्रेमानेच बद्ध होतो, बांधला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात -
भावबळे आकळे । येरव्ही ना कळे ॥करतळी आवळे । तैसा हरि ॥
ईश्वराबद्दल परमप्रेम असणं म्हणजेच भक्ती. ईश्वर हा प्रेमस्वरुप असल्यामुळे तो फक्त भावानेच, प्रेमानेच बांधला जातो. आमचे महर्षि नारद भक्तीसूत्रामध्ये म्हणतात -
सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा । अमृत स्वरुपा च ॥
भक्तीसाधनेमध्ये नुसतं प्रेम असून चालत नाही तर परमप्रेम असणं आवश्यक आहे. प्रेमाला 'परम' हे विशेषण दिलंय.
व्यवहारात प्रेम हा शब्द आपण वारंवार वापरतो परंतु या व्यावहारिक प्रेमात इतरांना गुलाम करण्याची महत्वाकांक्षा असते पण परमप्रेमात मात्र असा भावच नसतो. परमप्रेमात आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा सर्वकाही बाजूला ठेवायच्या असतात. परमप्रेमात स्वतःचा विचारचं नसतो तिथे स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्याची तयारी लागते. आचार्य ओशो रजनीश परमप्रेमाचं अतिशय बहारदार वर्णन करतात -
प्रेम खोज़ने की कला नहीं । प्रेम तो खोने की कला हैं ।प्रेम ज़ीनें की कला नहीं । प्रेम तो मरनें की कला हैं ।प्रेम में स्वयं को बचानें की कोशिश करतें हैं - वे मिट जातें हैं ।औरजो मरमिटनें के लिए हमेशा तैय्यार होतें हैं - वे बच जातें हैं ।प्रेम बेहोष प्रार्थना हैं...!प्रेम लेन नहीं, प्रेम तो देन हैं ।प्रेम माँग नहीं, प्रेम तो दान हैं ।प्रेम भीख़ नहीं, प्रेम तो स्वयं का समर्पण हैं ।बुद्धीवान लोग प्रेम नहीं कर सकते, केवल पागल लोग ही प्रेम कर सकते हैं ।क्यों की -प्रेम के लिए दीवानगी चाहिए ॥
तर असा हा भाव, असं हे परमप्रेम ईश्वरभक्तीत अपेक्षित आहे..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 8793030303 )