देवा तूंचि गणेशु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 07:43 PM2019-09-02T19:43:58+5:302019-09-02T19:49:15+5:30
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले.
- प्रमोद महाराज जगताप
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. आज हा उत्सव जगभरात भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा होताना दिसतो आहे. अशा या पर्वकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी मांडलेला ‘साहित्य गणेश’ अभ्यासणार आहोत .
‘ॐ नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या,
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’’ जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणाऱ्या ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री. गणेशस्तवनाने केला आहे. पुर्वासुरींचा आदर्श समोर ठेवला असता ग्रंथारंभी मंगलाचरण करावे, असा शिष्ट संप्रदाय आहे. ‘‘ग्रंथकारांते वाट पुसतु...,’’ वाटचाल करणारे ज्ञानोबाराय आपल्या ग्रंथाचे मंगलाचरण करतात. बहुतेक ग्रंथाचा आरंभ श्रीगणेशाय नम: अशा नमनाने झालेला पाहायला मिळतो. ग्रंथलिखाणात कोणतेही विघ्न येऊ नये, तो ग्रंथ सिद्धिस जावा, तसेच श्रीगणराजांना अग्रपूजेचा मान असल्याने ज्ञानेश्वर महाराज गणपतीस नमस्कार करतात.
नमनाचे एकूण तीन प्रकार आहेत. आशीर्वादरूप, नमस्क्रियारूप आणि वस्तुनिर्देशरूप. ग्रंथारंभीच्या या वीस ओव्यांत श्रीमाऊलींनी यथार्थ असे नमास्क्रियारूप मंगलाचरण केले आहे. श्रीज्ञानोबारायांनी केलेले गणेशस्तवन सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचे आहे. ओंकार हा शब्द ब्रम्हवाचक आहे. ते निर्गुण ब्रम्हाचे , शुद्धब्रम्हाचे प्रतीक आहे. ॐकार अशा निर्गुण ब्रम्हाला गणेशाचे रूप मानून श्रीज्ञानोबाराय सगुण गजाननाचे वर्णन करतात. ‘‘त्वं प्रत्यक्ष ब्रम्हासि असे गणपत्यथर्वशिर्षांत म्हटलेच आहे.हे ॐकारा तु सर्वांचे आदिकरण आहेस, तु वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहेस. तुला माझा नमस्कार असो. हे ॐकारा तु स्वत:च स्वत:ला जाणण्यास योग्य आहेस. समर्थ आहेस. अशा आत्मस्वरूप ॐकारा तुझा जयजयकार असो.
‘‘देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु,
म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जी...’ओम हे गणेशाचे प्रतिक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रम्ह म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा प्रकाशक म्हणजे श्रीगणेश होय . संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचे सदशिष्य श्री. ज्ञानोबाराय प्रार्थना करतात. हे प्रभो, ग्रंथनिर्मितीकरिता मजकडे लक्ष द्यावे.