चराचरी हरी गुरुमुखे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:44 AM2019-07-18T04:44:12+5:302019-07-18T04:44:17+5:30
गुरू म्हणजे कोण... तर निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू.
- शैलजा शेवडे
गुरू म्हणजे कोण... तर निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. इतर प्रापंचिक गोष्टी शिकविणारे अनेक असतात, पण जे ब्रह्म तत्त्वाची अनुभूती करून देतात, ते सद्गुरू...! त्यांनाच आपण ब्रह्म, विष्णू, महेश्वर म्हणतो... त्यांनाच साक्षात परब्रह्म असं म्हणतो. संत निवृत्तीनाथ त्यांच्या अभंगात म्हणतात,
गुरू परब्रह्म, गुरू मात पिता ।
गुरु विण दैवत नाही दुजे।
निवृत्ती म्हणे मज गुरू बोध दिठी ।
भक्ती नाम पेटी उघडली ।
आज निवृत्ती नाथांचे अभंग वाचताना मन अक्षरश: थरारून गेले. ते म्हणतात,
छेदियला वृक्ष, तुटले ते मूळ, प्रपंच समूळ उडोनी गेला,
गेले ते सुमन, गेला फुलहेतू, अखंडित रतु, गोपाळी रया ।
सांडिला आकारू, धरिला विकारु , सर्व हरीहरू एकरूपे ।
निवृत्ती निधान वोळले गयनी,
अमृताची धनी आम्हां भक्ता ।
संसार वृक्ष मी समूळ तोडला, त्यामुळे संसार नावाच्या फुलातील विषय नावाचा भोग गेला. प्रपंचातील आकार विकार सर्व गेले. शिव, विष्णू एक आहेत हे कळले. गुरूंच्यामुळे ज्ञानामृताची प्राप्ती झाली.
सर्वांघटी जो वसे, तो आम्हां प्रकाशे,
प्रत्यक्ष आम्हां दिसे, गुरु कृपा ।
सर्व शरीरात तो परमात्मा प्रकाशरूपाने, चैतन्यरूपाने राहत आहे, याची गुरूंच्यामुळे अनुभूती झाली ।
पूर्णबोधे धाले, आत्माराम धाले, निखळ वोतले, पूर्णतत्त्वे, पूर्वपुण्य चोख, आम्हांसी सफळ, गयनि कल्लोळ तुषार आम्हां ।
गुरूच्या कृपेने आम्हाला आत्मारामाचे दर्शन झाले. आमची पूर्वपुण्याई थोर, म्हणून आमच्यावर गुरूंनी नामामृताचे तुषार उडविले...!