वर्षत सकळ मंगळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 05:50 AM2019-04-15T05:50:12+5:302019-04-15T05:51:56+5:30
संत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे.
-प्रा. शिवाजीराव भुकेले
संत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे. संतांच्या समोरचा मानवी समूह केवळ प्रादेशिक पातळीवरची अंथरूणे अंथरणारा नव्हता, तर तो वैश्विक परिमाण प्राप्त झालेला होता. संतांनी विश्वातील प्रत्येक प्राणिमात्राकडे तो ईश्वराचा एक अंश आहे या पवित्र दृष्टीने पाहिले. त्यामुळे द्वेषाच्या इंगळ्या त्यांच्या मनाला कधी डसल्या नाहीत. सर्वव्यापी ईश चैतन्य कधी हा जवळचा व तो परका असा आपपरभाव करीत नाही. नीच माणसाला नष्ट करून सज्जनांना जीवनदान द्यावे हे जसे धरतीला माहीत नाही तसे दैनंदिन जीवनात संतांनी विश्वकल्याणाचा विचार येनकेन प्रकारांनी मांडताना म्हटले होते.
दिसो परतत्व डोळा । पाहों सुखाचा सोहळा ।
रिघों महाबोध सुकाळा । माजी विश्व ॥
सारे विश्व चैतन्याने अन् महाबोधाच्या सुकाळाने न्हाऊन निघावे अशी मंगलमय प्रार्थना करण्यासाठी दृष्टीत, विचारात, जगण्यात वा कृतीत पावित्र्य असावे लागते, तरच सारे विश्व सचिदानंदांच्या कंदातील अंश वाटू लागते. ज्ञानदेव आणि नामदेवादिक संतांनी समता, एकता आणि पावित्र्याचा ध्वज तिन्ही लोकी फडकविला तो एवढ्यासाठीच की, समाजाला जर सामर्थ्याचे, सृजनाचे, एकतेचे, समतेचे झरे खळखळत राहिले तरच उद्याचा बलिष्ठ व आत्मनिर्भर समाज निर्माण व्हायचा असेल तर माउलीच्या मांगल्याने समाजाकडे पाहण्याची प्रेममूर्ती गावागावात जन्माला आल्या पाहिजेत. लोकांची मने जोडण्यासाठी हिंंसा, विकार, मोडतोडीचा त्याग करून प्रेमाने, कारुण्याने, शांतीने, वात्सल्याने लोकांची मने जिंंकण्याचे क्षमाशास्त्र संतांनी आत्मसात केले.