रमेश सप्रे
गावाच्या कडेकडेनं वाहणाऱ्या नदीचा प्रवाह खूप देखणा होता. मुख्य म्हणजे पात्र फार रुंद नसलं तरी पाणी खोल होतं. प्रवाहात एक दोन भोवरेही होते. दोन्ही काठावरून त्यांची चक्राकार गती मोठी मोहक वाटायची. अनेक लोकांचं नदीवर नित्यस्नान करण्याचं व्रत होतं. त्यामुळे ज्यावेळी एक सफेद कफनी आणि डोक्यावर सफेद फेटा घातलेला साधू नदीच्या घाटावरच्या एका प्राचीन मंदिराच्या काळाच्या ओघात पडझड झालेल्या भागात येऊन राहू लागला तेव्हा साहजिकच अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. त्याच्याशी बोलाचाली सुरू झाली. अतिशय मधुर हिंदीमध्ये तो संभाषण करत असे. लोकांना ऐकत राहावंसं वाटे. प्रवचन, सत्संग वगैरे गोष्टी त्या साधूनं कधीच केल्या नाहीत; पण त्याचं एकूण व्यक्तिमत्त्व नि निरपेक्ष जीवनपद्धती लोकांवर प्रभाव पाडून गेली. त्याच्या खाण्या पिण्याची सोय आळीपाळीत करू लागले; पण साधूबुवा कामाशिवाय ना कोणाशी बोलत ना, कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत. सारी ईश्वराची लीला आहे. त्याच्या इच्छेनुसार विश्वाचे सारे व्यवहार चालतात, यावर त्यांची एवढी निष्ठा होती की ते कसलंही वाचन-पारायण, पूजा-प्रदक्षिणा, व्रत-उपवास करत नसत. नाही म्हणायला त्यांच्याजवळ असलेली बासरी ते अधून मधून वाजवत. त्यावेळी अनेकांना कृष्णबासरी ऐकल्याचा अनुभव मिळायचा. बासरीच्या स्वरात असलेली मधुरता, आर्तता, उत्कृष्टता सर्वाच्या हृदयाला स्पर्श करायची. साधूबाबा कोणतंही भजन वा भक्तिगीत वाजवत नसत. फक्त धून वाजवायचे दिव्य नि स्वर्गीय धून!
हे सर्व शांतपणे एक तरुण दुरून न्याहळत होता. त्याचं निरीक्षण सुरू होतं. साधूबाबांच्या अखंड प्रसन्नतेबद्दल..
एकदा त्यानं ते एकटे आहेत हे पाहून विचारलं सुद्धा. बासरी संगीतात रंगून गेल्यामुळे तुम्ही अखंड आनंदात असता का? साधूबाबा पटकन उद्गारले ‘अगदी उलट. बिलकुल विपरीत! मी अक्षय आनंदात असतो तो आनंद बासरीतून व्यक्त होतो. म्हणून ती सर्वाच्या अंत:करणाला स्पर्श करते.’
‘अच्छा, म्हणजे तुमच्या दिव्यमधुर बासरीवादनाचं रहस्य तुमच्या अंतरंगात अविरत उसळणारा आनंद आहे. मग तुमच्या या निखळ आनंदाचं रहस्य काय?’
आतापर्यंत उभ्या उभ्या चालू असलेल्या या संभाषणानंतर साधूबाबा म्हणाले, ‘युवक, जरा बैठकर बाते करेंगे। आओ बैठो।’ त्यांच्या स्वरात एवढी अजीजी, एवढं आर्जव होतं की काय होतंय ते कळायच्या आत तो तरुण त्यांच्यापुढे बसला सुद्धा. तुला माझ्या अखंड आनंदाचं रहस्य हवंय ना? ते अगदी सोपं आहे. सहज आहे. ‘मी असतो तेथे असतो नि मी जे करतो ते करतो.’ बस हेच ते रहस्य. युवकाला वाटलं साधूबाबा आपली थट्टा करताहेत. त्यानं तसं म्हटल्यावर बाबा एवढंच म्हणाले, ‘तुलाच कळेल आतापासून चोवीस तास तुझं तूच पाहा की तू जिथं असतोस तिथं असतोस का नि जे करतोस ते करतोस का? उद्या भेटू? साधूबाबा ध्यानमग्न झालेले पाहून तो युवक उठला नि घरी आला.
आल्या आल्या स्नानगृहात गेला. पाण्याचा फवारा डोक्यावर सोडला. जो जलस्पर्श जाणवल्यावर त्याला घरी आणून टेबलावर ठेवलेला फाईल्सचा गठ्ठा आठवला. बापरे आज खूप जागावं लागणार! लगेचच त्याला साधूबुवांचे शब्द आठवले. तो स्वत:शीच म्हणाला ‘म्हणजे मी आता बाथरुमऐवजी माझ्या खोलीत आहे तर अन् आंघोळीऐवजी फायली पाहतोय’ कशीबशी आंघोळ आटोपून जेवायला गेला. मनात विचार ‘उद्याची इन्स्पेक्शन नीट पार पडली म्हणजे झालं. गेल्यावर्षीसारखे शेरे नि ताशेरे नकोत’ आई म्हणत होती ‘कशी झालीय रे वांग्याची भाजी, तुला आवडेल तशी केलीय’ याला पानात काय वाढलंय याचा पत्ताच नव्हता. ‘कोणती भाजी’ हे स्वत:चे शब्द ऐकताच स्वत:शीच म्हणाला, ‘अरे मी जेवणाच्या टेबलावर नाही तर ऑफिसच्या टेबालावर पोचलोय अन् जेवण कुठं करतोय’ फायलीत डोकं खुपसून वाट बघतोय इन्स्पेक्टर येण्याची’ नंतर देवघरात प्रार्थना करतानाही तो साहेबांच्या केबिनमध्ये होता, प्रार्थनेऐवजी साहेबांचे रागाचे बोल ऐकत होता. झोपतानाही तो शयनकक्षात नव्हता अन् झोपेऐवजी नको ते चिंतन नि चिंताच करत जगत राहिला. दुसरे दिवशी सायंकाळी साधुबाबांना लोटांगण घालून म्हणाला, ‘आनंदाचं रहस्य खूप अवघड आहे. सहज सोपं नाहीय. मला मार्ग दाखवा.’
साधूबाबा हसून म्हणाले, ‘तरुणा, एकच कर अखंड वर्तमानकाळात राहा, भूत-भविष्यात गुरफटू नको हे ते आनंदाचं रहस्य. तथास्तु!