प्रसन्न मनच सर्व सिद्धीचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:55 PM2019-03-09T13:55:52+5:302019-03-09T13:56:44+5:30
मानवी मन हे चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टीस कारणीभूत आहे.
देह त्यागीता कीर्ती मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।।
मना चंदनाचे परित्वा झिजावे ।
परी अंतरी सज्जना निववावे ।।
संत रामदासांनी अंत्यत अनमोल विचार आपना स्थापित करून गेले. श्रोता आणि वक्ता यामधील संवाद आणि विसंवाद यास बाजूला सारत 'स्वतःच्या मनाला' समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी मन हे चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टीस कारणीभूत आहे. मनाच्या आदेशानुसार पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय कार्य करताना दिसून येतात. या मनाला आवर घालणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला ते संत, महात्मे झाले. बहिणाबाई यांनी देखील अत्यंत सूचक व मार्गदर्शक शब्दात वर्णन करीत म्हंटले आहे,
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येति पिकावर
यापेक्षा मानवी मनाची अवस्था व्यक्त केली जाऊ शकत नाही. मन हे जसे कृतीची उगमस्थान आहे तसेच विकृतीचे देखील सामाजिक स्थैर्य राखणे, घडविणे आणि बीघडविण्याचे कार्य मन अत्यंत वेगाने करत असते. विकृतीचा प्रचार आणि प्रसार विद्युत गतीने होत असल्याचे आपण पाहतो आहोतच. 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे आपण जाणतोच. पराचा कावळा होणे ही उक्ती आपण लहानपणापासून ऐकत आहोत. त्यामुळे मनावरील ताबा आणि संयम महत्त्वाचा आहे. आता गरज आहे सात्विक विचारांची आणि संयमाची. मनाला चंदनासारखे सुगंध पसरविण्याची आज्ञावली सुकृत करणे गरजेचे आहे. अहंकाराचा अश्व खंडित करून सत्कार्य व सद्भावना वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. त्यामुळे मनाला काय अवगत करावे, याचे वर्णन समर्थ रामदासांनी सुंदरपणे केले आहेत.
मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्ये सर्व बुडाले
म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी
बळे लागला काळ हा पाठिलागी
व्यक्तींच्या विचारावरून त्याचे वर्तणूक होत असते. मन, दृष्टी आणि जीव्हा यांच्या आहारी जाणारा अखेर विचारांनारूप प्राप्त करतो. रावणासारखा शूरवीर राजा देखील आपल्या वाईट इच्छेमुळे गतीस प्राप्त झाला. तिथे इतरांची काय बिशाद. म्हणून मनास वाईट प्रवृत्तीस दूर ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अधःपतन होणार नाही. जे आपले नाही त्याचा मोह करू नये. कर्म आणि प्रारब्ध यातून जे प्राप्त होते, तेच आपले. अन्यथा सर्व बाबी अंगलट येतात. मनाचा वारू सुसाट धावत असेल तर त्याला वैराग्याचा दोरखंड बांधणे गरजेचे. अन्यथा शेवट काय हा अंदाज देखील मांडणे अवघड असते. मनाची जडणघडण अशी झालेली असते की जे चांगले ते ते माझे जे मी करतो तेच खरे असे वाटत असते. मनाची चंचलता माणसाचे ध्येय बिघडविते. मनाचे सामर्थ्य ओळखण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. आपण निश्चित केलेले ध्येय साध्य होइपर्यंत थांबणे नाही. हे मनाला पटवून दिले पाहिजे. मनाचा निग्रह, मनोधैर्य एका दिवसात वाढत नाही. त्यासाठी एकाग्रतेने मनाशी सुसंवाद साधावा लागतो. तोच वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होतो. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात,
मन करा रे प्रसन्न।
सर्व सिद्धीचे कारण।।
मन गुरू आणि शिष्य।
करी आपलेची दास्य।।
- भालचंद्र.ना.संगनवार
(लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )