खडतर कष्टानेच मिळतो सुखाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:48 PM2019-08-03T13:48:05+5:302019-08-03T13:50:17+5:30
क्षणिक आणि अल्पकालीन सुखाच्या मागे लागून दीर्घकालीन दु:ख ओढवून घेणे उचित नाही.
- डॉ. भा. ना. संगनवार
सर्व काही नाशिवंत असतानादेखील माणूस अहोरात्र सुख मिळविण्यासाठी धडपडत असतो. मानवी जीवनात सुखापेक्षा दु:ख जास्त व यशापेक्षा अपयश जास्त असते. तरीदेखील प्रयत्न करण्याचे कुणीही थांबत नाही. महात्मा गौतम बुद्धांपासून संत तुकारामापर्यंत सुख आणि दु:ख याचा गंभीरतेने विचार करुन परामर्ष केला आहेच. क्षणिक आणि अल्पकालीन सुखाच्या मागे लागून दीर्घकालीन दु:ख ओढवून घेणे उचित नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुखाची व्याप्ती दाखविताना सांगतात...
सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ।।
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ।।
आपल्या आयुष्यात अथक प्रयत्नांती मिळणारे सुख हे तिळाच्या दाण्याएवढे असून दु:ख मात्र पर्वताएवढे आहे. म्हणूनच संत समागमातून अध्यात्माच्या विसाव्यात स्थिरावल्यास दु:खाची धार बोथट होऊन जगण्याची आणि नवीन निर्मितीची ऊर्मी निर्माण होते. भूतकाळाचा विचार सोडून वर्तमानात जगत असताना भविष्याचा वेध घेणारी व्यक्ती यशाची शिखरे पादाक्रांत करीत असते. अशाच व्यक्तींना सुखाची प्राप्ती होते. हे सर्व करीत असताना मानवी देह हा अत्यंत कमी कालावधीकरिता सक्रिय राहतो. हे सिद्ध करण्याची गरजच नाही. बाल, युवा, वृद्धावस्थेतून जात असताना सुरुवातीची आणि अखेरची अवस्था ही कर्म करण्यास असमर्थ स्वरुपाची असते. उरतो तो कालावधी फक्त युवा अवस्थेचा. ज्यामध्ये स्वहितासोबतच राष्ट्रहित, समाजहित व देशहिताने प्रेरित व्यक्तीच या समाजाचे नायक होतात. अन्यथा आयुष्यातील काळ व्यर्थ जातो.
नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे
तुका म्हणे पुढा । घाणा जूंती जसी मूढा ।।
आयुष्यातील बहुतांश कालावधी बालपण, वृद्धापकाळ आणि व्याधी यामध्येच संपते. जे काही थोडेफार उरते ते माणूस अहिक सुख प्राप्त करण्याकरिता घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे संसाराचे ओझे वाहण्यात संपवितो. म्हणूनच संतांच्या माध्यमातून विरक्त भावनेने ईश सेवा केल्यास आत्मीक सुखाची प्राप्ती होते.
जगाच्या कल्याणा संताची विभूती । देह कष्टविती परोपकारे ।।
भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलबिंदू कोणता यावर चिंतन केल्यास एक लक्षात येईल की, दु:ख हाच मूलबिंदू आहे. प्रारंभापासून ते अंतापर्यंत दु:खाचा सामना प्रत्येकास करावा लागतोच. राजपुत्र सिद्धार्थ सर्व सुख-सुविधांच्या राशीवर पहुडला होता. परंतु वार्धक्य, रोग आणि मृत्यू या तीन दु:खांचे दर्शन झाले. त्यास वैराग्य प्राप्त झाले आणि पुढे बुद्ध होऊन ‘सर्वम दु:खम’ या आर्यसत्याचा त्यांनी उच्चार केला.
आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक या तीन बाबींमुळे मानवाचे जीवन हतबल आणि अगतिक झाले आहे. सर्व तत्त्वज्ञानाची सुरुवात दु:खामुळे जरी असली, तरी त्याचा अंत मात्र दु:ख पर्यवसाची नाहीच. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान अध्यात्माच्या बळावर आशादायी म्हणून जागृत आहे. मनावर ताबा ठेवून सद्सद्विवेक बुद्धीने कार्य केल्यास दु:खाची बाधा होत नाही. सुख आणि दु:ख दोन्ही वेळी ‘एकमेका साह्य करु । अवघे धरु सुपंथ ।। या उक्तीप्रमाणे आचरण केल्यास ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या ज्ञानेश्वरांच्या विभसुखाची प्रार्थना सत्यात उतरणारच, यात तिळमात्र शंका नाही.
( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )