तो मूर्तिमंत जाण दया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:54 AM2019-07-08T05:54:08+5:302019-07-08T05:54:11+5:30

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची ...

He knows the idiotic! | तो मूर्तिमंत जाण दया !

तो मूर्तिमंत जाण दया !

Next

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची पाने खाऊन सच्चिदानंदांच्या कंदातील ब्रह्मनंद आपल्या भावार्थदीपिकेच्या रूपाने जनता जनार्दनास वाटला. संन्याशांची मुले म्हणून ज्यांनी उपेक्षा केली, त्यांना शापही नाही की उश्शापही नाही. कर्मठांनी झोळी मोडून टाकल्यानंतरसुद्धा माउलीने त्यांच्यावर आपल्या कृपेची छायाच पांघरली; म्हणूनच तर कारुण्याचा मूर्तिमंत महासागर म्हणजे संत ही संतत्वाची परिभाषा आपल्या आचरणाने महाराष्ट्रासमोर आणण्याचे काम या मायमाउलीने केले. अग्नीप्रमाणे भडकणाºया सामाजिक विकारावर आपल्या कारुण्यमय विचारांचे शिंंपण करतो तो संत, अशा दयावान, मूर्तिमंत कारुण्य पुरुषाचे वर्णन करताना ज्ञानोबा माउली म्हणतात -
तो पुरुष वीरराया । मूर्तिमंत जाण दया ।
मी उदयजातांची तया । ऋणिया लाभे ।
निर्भर्त्सर भावनेने समाजातील सर्वच प्राणिमात्रांवर समान दृष्टीने दया करतो तोच खरा संतत्वाच्या पदवीपर्यंत जाऊन पोहोचतो. कारण संताचे येणे, राहणे व जाणेसुद्धा समाजासाठीच असते. समाजाच्या कल्याणासाठी आपला देह झिजविणे ही तर संतांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. गोठ्यामध्ये हंबरणाºया वासरासाठी चौखूर उधळत जाऊन त्याला दुग्धपान करण्याचे पाठ गायीला कोणी शिकवीत नाही. रडून रडून आक्रोश करणाºया बालकाला छातीशी कसे कवटाळावे यासाठी आईला कुठल्या विद्यापीठाची पदवी घ्यावी लागत नाही. पिलाच्या चोचीत दाणे भरविणाºया पक्षिणीला कुठल्या मंत्रांची गरज नसते. तद्वत संतांना दुसºयावर दया करण्यासाठी मंत्र-तंत्राची गरज लागत नाही. कारण, ज्याला-ज्याला तहान लागते, तो-तो पाण्याच्या शोधार्थ भटकू लागला अन् एकदाचे का पाणी मिळाले तर पाणी ते पिणाºयाला त्याची जात, धर्म, प्रांत, देश विचारत नाही, तर तहान भागविणे हेच पाण्याचे आद्यकर्तव्य होय. तद्वत कारुण्यमूर्ती संत देशकालाच्या व व्यक्ती आणि समाजाच्या कृत्रिम बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर समान भावनेने कृपा करण्याचे कामङ्ककरतात. निंदक, सज्जन, दुर्जन, भक्त या सर्वांवर समान भावनेने कृपावंत होणारा पर्जन्य म्हणजे संत होय. आपल्या पुत्र-पौत्रादिकावर तो जेवढ्या प्रमाणात ‘दया’ करतो, त्यापेक्षा चार पटीने अधिक जे आपले संबंधी नाहीत त्यांच्यावर कृपावंत होणारी मूर्तिमंत माउली म्हणजे संत. समाजात दैवी गुणांचे संवर्धन व्हावे म्हणून ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरीच्या १६व्या अध्यायात ज्या दैवी संपदेचे अर्थात दैवी गुणांचे वर्णन केले, त्यातील अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे ‘दया’ हा होय. जेव्हा धरणीमातेच्या गर्भातून बीजाचे अंकुर होऊन उर्ध्वगामी होता-होता पर्जन्याची याचना करू लागते, तेव्हा धोऽऽ धोऽऽ कोसळणाºया पर्जन्यधारा स्वत:ला धरतीच्या गर्भात गाडून घेतात आणि अंकुराचे रोपटे व्हावे म्हणून आपल्याङ्कसमर्पणातच आपल्या जीवनाची खरी सार्थकता आहे, असे पर्जन्यधारांना वाटते. तसेच असते दयावंत संतांचे. समाजातील दुर्गुण नष्ट व्हावेत व त्याने सद्गुणांची पाऊलवाट चोखाळावी म्हणून संत नावाची कारुण्यमूर्ती स्वत:ला समाजाच्या तळाशी गाडून घेते व समाजास उर्ध्वगामी करून समाजाचे दु:ख नाहीसे झाले की त्यास तोच ब्रह्मानंद वाटतो. ज्याचे वर्णन करताना तुकोबारायसुद्धा म्हणाले होते -
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा अन् दासी
तुका म्हणे सांगो किती । तोचि भगवंताची मूर्ती ।

प्रा. शिवाजीराव भुकेले

Web Title: He knows the idiotic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.