मनाच्या प्रसन्नतेवरच आरोग्य अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 07:22 AM2020-01-13T07:22:48+5:302020-01-13T07:22:59+5:30
मानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
मानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नतेवरच सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मात करते. हळवे मन छोट्या-छोट्या गोष्टींवरून कमजोर बनते. मनाची चंचलता ही तुमच्या प्रगतीला आड येते. चंचल मन असल्यास जीवनात अस्थिरता येते. स्थिर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवा. दिवसागणिक-क्षणोक्षणी मनात येणारे विचार कुठल्याही कार्याला प्रेरणा देतात किंवा नुकसानदायक ठरतात. संयमशील मन मनाची निर्णयक्षमता वाढवते. कर्म चांगले करा मनाला विकारापासून दूर ठेवा. मन एका ठिकाणी न बसता सर्वत्र फिरते. मनाला आवर घालणे महाकठीण काम असते. मनाला नम्र बनवायचे असेल तर ध्यानधारणा-योग यांचा आधार घ्यावा लागतो. ‘मन’चा शब्दाचा उलट अर्थ केला तर नम: होता. नेहमी तुम्ही सद्वृत्तीत मन रमवा. सद्वृत्ती मनाला आवर घालते. वासनांना आळा घालण्यासाठी मनाचा उपयोग होतो. सर्वप्रथम कुठलाही विचार मनात येतो. त्यानुसार बुद्धी कार्याला प्रवृत्त करते. मनाची स्थिती-गती-लय- आपल्या वैचारिकतेवर अवलंबून असते. ‘मन गया तो जाने दे। मत जाने दे शरीर। ना खिचे कमान को कहा लगेगा तीर।।’ असे संत कबिरांनी सांगितले आहे. एखादवेळेस मन कुठेही भटकते, तसे शरीराला भटकू देऊ नका. मनाप्रमाणे इंद्रियं धाव घेतात; पण त्यावरती संयम ठेवून वागणे महत्त्वाचे असते. मनाचे भावच वैचारिक भाव बदलवतात.
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)