हिंदुस्थान ही ऋषीमुनींची तर महाराष्ट्र ही संतांची भूमी. या थोर भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वी वेद आणि उपनिषदांच्या माध्यमातून अगाध व गुढ असे ज्ञान जगाला दिले. वेद उपनिषदातील गुह्य न समजल्याने समाज कर्मकांडात अडकला. भगवान श्रीकृष्णाने समाजाला या कर्मकांडांतून बाहेर काढण्यासाठी व जीवन जगण्याचा मुलमंत्रच भगवत गीतेतून दिला. वेद उपनिषदातील राजविद्या, राजगुह्यच जगाला देऊन शाश्वत कल्याणाचा व जगण्याचा दिपस्तंभच जगाला दिला.
संपूर्ण भारतभर असंख्य साधू संत अनंत व आनंद स्वरूप असणार्या या परमेश्वराला आकळण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातीलच थोर परंपरा असणारा आदिनाथांपासून चालत आलेला नाथ संप्रदाय उदयाला आला. संन्याशी व बैरागी असणाऱ्या या संप्रदायाचा वारसा सुद्धा आदिनाथांपासून गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ असा चालत चालत बाराव्या शतकात ज्ञानदेवांपर्यंत आला. फक्त संन्याशी बैरागी विरक्तां पुरताच मर्यादित या संप्रदायातूनच ज्ञानदेवांनी गृहस्थाश्रमींसाठी वारकरी संप्रदाय निर्माण केला आणि हा ज्ञानाचा वारसा घराघरांत पोहचविला.
भगवंताचे गीतेचे महान तत्वज्ञान संस्कृतमध्ये असल्याने संस्कृत न समजणारी सर्वसामान्य जनता या महान तत्वज्ञानाला पारखी होऊन बसली आहे. हे सर्व जाणून ज्ञानाच्या या ईश्वराने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ईश्वरी ज्ञानाचा कुंभ प्राकृत भाषेतील ओव्यांतून जगाला दिला व घरांघरांतून गुंजणार्या या आोव्यांतून हा ज्ञानराजा सर्वसामान्यांची माऊली झाला. या माऊलीने २१ व्या वर्षी समाधी घेतली व हा आपला वारसा आणि वसा सर्व संताना दिला. संताची मांदिआळी असणार्या महाराष्ट्रातील सर्व संतानी ह्या ओव्यांना अभंगाचे रूप दिले व महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर जाऊन वेगवेगळ्या भाषेतून किर्तन, प्रवचन व भारूड या विविध माध्यमातून अज्ञान, अंधश्रद्धा व कर्मकांडांवर प्रहार करीत शुध्द व दिव्य असे हे ज्ञान मानवाच्या गळी उतरवू लागले. स्वतःचा देह चंदना सारखा झिजवून जगाला जीवन देऊ लागले.
ज्ञानदेवी रचिला पाया। तुका झालासे कळस॥
नाथ संप्रदायही बदलला गेला व गृहस्थाश्रमी संत निर्माण होऊ लागले. संत ज्ञानदेवांपासून गुंडानाथ, पंढरीनाथ, कृष्णानंद, नारायण माऊली या शिष्य परंपरेने हा वारसा सदगुरू श्री वामनराव पै यांच्या पर्यंत अाला. उच्चशिक्षित असणार्या सदगुरूंनी चिंतन केले की, आजपर्यंत युगानुयुगे असंख्य ऋषीमुनींनी, प्रत्यक्ष भगवंतांनी व संतांनी मानवजातीला भरभरून सर्वांगीण, परीपुर्ण व महान ज्ञानाची बरसात केली तरी सुध्दा मानवजात खर्या अर्थाने सुखी का होत नाही? व्यक्ती, कुटूंब, समाज, राष्ट्र व विश्व या स्तरांवर पाहिजे तसा बदल दिसत नाही. मग प्रश्न निर्माण झाला की, आपल्या महान देशात देवांचे, ऋषीमुनींचे, संतांचे अवतार झाले मग आपल्या देशाचा अवतार असा का? या चिंतनातून त्यांनी जाणले की, ऋषीमुनींच्या संस्कृत ऋचा, संतांच्या पद्यातील ओव्या व अभंग लोकांनी पाठ केल्या पण त्यातला गर्भितार्थ समजून घेतला नाही कारण हे ज्ञान संस्कृत व पद्यात आहे. म्हणून त्यांनी ऋषीमुनींचे तत्वज्ञान, संतांची शिकवण यावर केलेले खोल व सुक्ष्म चिंतन, साधनेतून अालेले दिव्य अनुभव व नाथ संप्रदायिन सदगुरूंची कृपा या सर्वांच्या मिलनातून साध्या, सोप्या भाषेतून व दैनंदिन उदाहरणातून मांडलेले वास्तववादी, प्रयत्नवादी व विकासवादी जीवनविद्या हे तत्वज्ञान उदयाला आले.
संत एकांती बैसली। ज्ञानदृष्टी अवलोकिले।शोधून काढीले। ते हे श्रीहरीचे नाम॥
संतानी मानवजातीच्या कल्याणासाठी नामाचा अलौकिक शोध लावला. या दिव्य नामाचा प्रचार व प्रसार व्हावा, या सदहेतूने सर्वसामान्य गृहस्थाश्रमी मानवासाठी १९५२ साली सदगुरू श्री वामनराव पै यांनी नाम संप्रदाय मंडळ या संस्थेची निर्मिती केली. किर्तन व प्रवचनातून संतांचे ज्ञानामृत साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेत अवतीर्ण होऊ लागले. समाज या ज्ञान व नाम प्रवाहात येऊन सुखी होऊ लागला. त्यातूनच "हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे" या संकल्पाचा ध्यास घेणारे जीवनविद्या मिशन साकार झाले. "घर तेथे जीवनविद्या" जावून प्रत्येक माणूस सुखी व्हावा, या कार्यासाठी सदगुरूंचे लाखो स्वयंसेवक जीवनविद्या मिशनच्या झेंड्याखाली एकत्र येऊन गेली ७० वर्षाहून अधिककाळ निरपेक्षपणे व सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करू लागले.
-संतोष तोत्रे