घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती; आनंदाचं घर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:52 PM2019-08-20T18:52:00+5:302019-08-20T18:52:14+5:30

वास्तुशांती विधी तर प्रत्येक जण नवी वास्तू बांधून तिच्यात राहण्याचा आरंभ करण्यापूर्वी करतो.

The house should be like a house, not just walls; House of joy | घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती; आनंदाचं घर 

घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती; आनंदाचं घर 

Next

रमेश सप्रे

आजकाल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्वजण एक खेडं (ग्लोबल व्हिलेज) झालंय असं म्हटलं जातं. आपण ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणतो. म्हणजे सारं जग- आपली पृथ्वी - एक कुटुंबच आहे. त्याहीपेक्षा जवळचं म्हणजे घरकुल. त्याहीपेक्षा लहान पण तितकेच प्रेमळ नि उबदार म्हणजे घरटं. रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या विश्वभारती विद्यापीठाचं बोधवाक्य निवडलं होतं की हे विद्यापीठ, शांतीनिकेतन एक छोटंसं घरटं आहे, विश्वातील सर्व लोकांसाठी. साधुसंताना ‘हे विश्वचि माझे घर’ अशी सर्व सजीव-निर्जीव गोष्टींबद्दल आपुलकी असते. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ अशी प्रार्थनाही संतमंडळी करत असतात. अलीकडे अनेक घरांच्या भिंतींवर एक कविता टांगलेली (किंवा चिटकवलेली) आढळते.
घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती।
तिथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती।।
कवितेतील भावना सुंदरच आहे; पण किती घरात ही भिंतीवरची कविता जमिनीवर उतरलेली दिसते? वास्तुशांती विधी तर प्रत्येक जण नवी वास्तू बांधून तिच्यात राहण्याचा आरंभ करण्यापूर्वी करतो. ख्रिस्ती बांधव या विधीला ‘हाऊस वॉर्मिग किंवा ‘हाऊस ब्लेसिंग’ असं म्हणतात; पण अशी शांत, प्रेमाची ऊब असलेली घरं किती दिसतात? एक महत्त्वाची गोष्ट या सर्वात विसरली जाते ती म्हणजे व्यक्ती शांत झाल्याशिवाय वास्तू शांत होणार नाही. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात, संबंधात ऊब नसेल तर हाऊसवॉर्मिग फक्त एक कर्मकांड ठरतं. पण हा अनुभव सार्वत्रिक आहे. 

कसं असावं आनंदाचं घर? ‘घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे?’ किंवा ‘असावे घरकुल आपुले छान’ अशी गीतं पूर्वीच्या काळात म्हटली जायची तेव्हा ती अनेक घरातली कुटुंबातली परिस्थिती किंवा वस्तुस्थिती होती. काही कथा-कहाण्यांतून या विषयी प्रेरक मार्गदर्शन मिळतं. 

एका घरात अनेक वर्षानी एक पाहुणा घरातील कर्त्या व्यक्तीला -त्याच्या मित्राला- भेटायला येतो. मधल्या काळात तो मित्र मृत्यू पावलेला असतो. त्याला वाईट वाटतं आपला जीवलग दोस्त गेल्याबद्दल. पण त्याहून अधिक वाईट वाटतं ते घराच्या करूण परिस्थितीबद्दल. संपूर्ण घर पाहिल्यावर परसात गेला. तिथंही पूर्ण दुर्लक्ष झालेलं त्याच्या लक्षात आलं. एक मोठं शेवग्याचं झाड मात्र लक्ष वेधून घेत होतं. हे झाड काही वर्षापूर्वी त्याच्या मित्राच्या वडिलांनी लावलं होतं. त्याच्या अनेक स्मृती जाग्या झाल्या. 

रात्रीचं जेवण झाल्यावर मित्राच्या आईला विचारलं ‘घराची अशी दशा का झाली’ तिच्या डोळ्यासामोर भूतकाळ उभा राहिला. अनेक गोडकडू आठवणी मनात दाटून आल्या नि गालावरून अश्रू ओघळू लागले. हलक्या स्वरात आजी बोलू लागली, ‘काय सांगू तुला? तू माझ्या मुलाचा जवळचा मित्र. पूर्वीचं वैभव तुला आठवत असेलच. तुझ्या मित्राचा आकस्मिक मृत्यू झाला नि घराची दशाच पालटली. आम्हाला सारं गाव शेवगेवाले पाटील म्हणून ओळखतं. माझ्या पतींच्या काळात त्यांनी लावलेल्या शेवग्याच्या झाडाला लागलेल्या असंख्य शेंगा आम्ही गावकर वाटत असू. त्यामुळे हे शेवग्याचं झाड आमचं जणू परिचय पत्र (आधारकार्ड) बनून गेलं. शेवगेवाल्या पाटलांची मुलं-सुना दुस:यांच्याकडे नोकरी चाकरी कशी करतील? आणि ‘तुम्ही मोठी माणसं आम्ही तुम्हाला नोकर म्हणून कसं वागवू?’ असं म्हणून कुणी नोकरी देतही नाही. त्यामुळे एका अर्थी अन्नान्न दशा होऊन राहिलीय. आजीनं एका दमात सारी रडकथा ऐकवली. काही क्षण तो मित्रही सुन्न झाला. काय बोलावं हे समजेना. आपल्या आसवांना वाट करून देण्यासाठी तो उठून झोपायला गेला. रात्रभर तळमळत राहिला. काहीतरी करून त्याला त्या कुटुंबाला साह्य करायचं होतं. शेवटी पहाटे पहाटे त्याच्या मनात एक कल्पना आली. तो उठला.

मागच्या परसात गेला. गोठय़ात एक कु:हाड पडलेली त्याला दिसली. सपासप घाव घालून त्यानं ते शेवग्याचं झाड तोडून जमीनदोस्त केलं. अतिशय ठिसूळ असल्यामुळे झाड तोडायला फार वेळ लागला नाही. ज्यावेळी ते झाड कोसळलं त्यावेळी अजून पहाटच असल्यानं घरातलं कुणीही उठलं नव्हतं. अगदी हलक्या पावलांनी बिलकुल आवाज न करता त्यानं आपली बॅग उचलली नि तो निघून गेला.
सकाळी उठल्यावर घरातल्या माणसांना तो पाहुणा शोध घेऊनही मिळाला नाही. परसात गेल्यावर त्यांना ते पाडलेलं शेवग्याचं झाड दिसलं. सगळ्यांना घरातली कुणी व्यक्ती मरावी तसं दु:ख झालं. यातून सावरताना त्यांची आजी म्हणाली, ‘आता जर शेवग्याचं झाडच राहिलं नाही तर कसले आपण शेवगेवाले पाटील. इतरांसारखीच सामान्य माणसं आहोत आपण. आता विसरा ते शेवगेवाले-बिवगेवाले. मिळेल ते काम करायला लागा.’ आश्चर्य म्हणजे सर्व मुलांनी-सुनांनी नोकरी, छोटे व्यवसाय सुरू केले नि पुन्हा त्या घरात आबादी आबाद झालं.

वडिलांच्या मित्रानं ते शेवग्याचं झाड तोडून त्या घरावर अप्रत्यक्ष उपकारच केला होता. सारा खोटा अभिमान, मोठेपणाच्या खोटय़ा, चुकीच्या कल्पना घट्ट बाळगल्यामुळे जी दशा झाली होती ती सुधारली. वैभवाची होळी संपून दिवाळी सुरू झाली होती. आनंदाचं सूत्र त्यांना मिळालं होतं. खोटय़ा अहंकाराचा त्याग आणि श्रमप्रतिष्ठा आनंदाला लागलेलं ग्रहण सुटलं होतं. घर पुन्हा आनंदाच्या प्रकाशानं उजळून निघालं होतं. 

 

Web Title: The house should be like a house, not just walls; House of joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.