निराशा घालविणारी भेट झाल्याशिवाय माणूसपण कसं उभारून येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:58 AM2019-05-28T04:58:35+5:302019-05-28T04:58:45+5:30

रांगेतल्या मुंग्या एकमेकांना भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत.

How can a man be born without a disappointment visit? | निराशा घालविणारी भेट झाल्याशिवाय माणूसपण कसं उभारून येईल?

निराशा घालविणारी भेट झाल्याशिवाय माणूसपण कसं उभारून येईल?

Next

- बा.भो. शास्त्री
रांगेतल्या मुंग्या एकमेकांना भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत. कुणी कुणाला चावत नाही. त्या काय म्हणत असतील ‘‘बरी आहेस का तू, बरी आहेस का तू’’ असंच म्हणत असतील. कुत्र्यांच्या भेटीचं स्वरूप वेगळं असतं. तिथं भुंकण्याशिवाय काही नाही.
‘‘तुमच्या भेटीत देव भेटे
आणिक पाडाचे गोमटे
नवनीत लाभे अवचटे
परशास्त्राचे’’
सूर्याच्या भेटीने सूर्यफूल उमलतं, चंद्राच्या भेटीत सोमकांत द्रवत असतो. दूध-साखर भेटते तेव्हा स्वाद भेटतो. कृष्ण-सुदामाच्या भेटीत मैत्रभाव भेटतो व राम-भरताच्या भेटीत बंधुभाव दिसतो. भेट सजातीय असावी. पाणी पाण्यात मिसळतं. तेल पाण्यात मिसळत नाही. प्रेम प्रेमाशी एकरूप होतं. ही भेट विजातीय असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलाची भेट ही विळ्या-भोपळ्याचीच भेट ना? आज माणसं वर्तमानपत्र वाचतात. भावना वाचत नाहीत. दूरदर्शन पाहताना शेजारी बसतात, पण बोलत नाहीत. शब्द असून संवाद थांबला आहे. कानाच्या दारावर मोबाइलचा पहारा आहे. विवंचना, धावपळ, टेन्शन, नसलेल्या सुखाच्या अभावात दु:खी असलेला माणूस असलेल्या वस्तूच्या सुखाला वंचित झाला. फुटपाथवरचा भिकारी चांगला झोपतो. पलंगावर चिंता झोपू देत नाही. याचं कारण एखादा संत, सज्जन किंवा विचारवंताची भेट होत नाही हेच तर आहे. सूत्रात पाड शब्द आहे. पाडाला आलेला आंबा रसाळ व मधुर असतो, उमेद वाढविणारी, निराशा घालविणारी अशी भेट झाल्याशिवाय पुसत चाललेलं माणूसपण कसं उभारून येईल?

Web Title: How can a man be born without a disappointment visit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.