मी कोठुनि कोण आलो कसा हो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 05:54 PM2019-03-16T17:54:55+5:302019-03-16T17:55:06+5:30
मनुष्य जीवन जगात असताना नुसते जगत असेल तर ते जीवन सार्थकी लागत नाही. आपण जन्माला का आलो हे जर कळत नसेल तर त्या जीवनाला काहीही अर्थ नाही.
मेलबोर्न (आॅस्ट्रेलिया) : मनुष्य जीवन जगात असताना नुसते जगत असेल तर ते जीवन सार्थकी लागत नाही. आपण जन्माला का आलो हे जर कळत नसेल तर त्या जीवनाला काहीही अर्थ नाही. ‘खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, हीच करी हाव संसारिक, फक्त खावे आणि चैन करावी व एक दिवस मरून जावे हि खरी चांगली जीवनशैली नाही तर पशुवत जीवनशैली आहे. आपण जन्माला का आलो? येथे येवून काय करायचे आहे? व शेवटी कुठे जायचे आहे? मी कोण आहे? हे प्रश्न आम्हाला कधी पडतच नाही. खरी सुख शांती जर मिळवायची असेल तर अगोदर वरील प्रश्न सुटले पाहिजे.
संत श्रेष्ठ माउली ज्ञानोबाराय म्हणतात, ‘आहे मी कोण करावा विचार ‘म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा’ मी कोण आहे हा विचार महत्वाचा आहे. कारण ज्या देहात आपण राहतो तो देह नाशिवंत आहे. त्याला स्वभावात: नाश, आश्रय नाश, परत: नाश आहे. शिवाय या देहाला आपण जाणतो, देह आपणास जाणीत नाही. देह जड आहे व जाणणारा चेतन आहे. या देहाची निर्मिती कशी झाली? हेही महत्वाचे आहे. हा देह पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंच महाभूतांचा आहे. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, अंत:कारण चतुष्ट्य, पंच प्राण अशा साधारणपणे चोवीस तत्वांचा हा देह बनलेला आहे. सांख्य शास्त्रकार काही ठिकाणी छातीस तत्वांचा देह आहे, असेही सांगतात. त्या सांख्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक सेश्वर सांख्य व दुसरे निरीश्वर सांख्य. असो मनुष्य देह निर्माण करायच्या अगोदर अनेक प्रकारचे देह ब्रह्मदेवाने निर्माण केले, त्यात जारज, स्वेदज, अंडज,उद्भिज या चार प्रकाराने देह निर्माण झाले पण! अनंत प्रकारचे प्राणी निर्माण होऊनही त्याला समाधान वाटेना. कारण या प्राण्यापैकी देवाला कोणी ओळखीना. म्हणून मनुष्य देह निर्माण केला गेला. ‘नरदेहाचेनी ज्ञाने सदचिदानंद पदवी घेणे’ एवढा अधिकार नारायणे ‘कृपावालोकाने दिधला’ तात्पर्य देवाने हा मनुष्य देह सद, चिद आणि आनंद हे जीवाचे असलेले स्वरूप ओळखण्याकरीता दिला आहे पण आपण ते विसरून गेलो.
ज्ञानेश्वर महाराज मदालसामध्ये फार छान सांगतात, ‘हा देहो नाशिवंत मळमुत्राचा बांधा । वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा । रवरव दुगंर्धी रे अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा॥५॥ या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा? सा । माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा । बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा ते सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥ गर्भवासाचे दुख भयंकर आहे तेव्हा हा जीव गर्भामध्ये असतांना सोहम म्हणजे तो मी आहे, असे म्हणत होता आणि गर्भामधील दुखा:ला तो त्रासाला होता. तेव्हा देवाला प्रार्थना करीत होता कि मला या गर्भावासातून सोडव. मी जन्मल्यावर तुलाच आठवीन, तुझे स्मरण करीन आणि जन्मल्याबरोबर सोहमच्या ऐवजी कोहम म्हणू लागला. विस्मरण हेच अज्ञान आहे आणि स्मरण म्हणजेच ज्ञान होय. पण ते कोणते स्मरण तर ‘आत्म्याचे स्मरण’ आपुला आपणपेया विसरू जो धनंजया तेची रूप यया अज्ञानासी ज्ञा आणि हे अज्ञान घालवणे म्हणजेच मोक्ष, मुक्ती, सुख, ज्ञान. आपण या देहामध्ये फक्त ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता आलो आहोत. कारण याच ज्ञानाने मोक्ष मिळणार आहे बाकी कशानेही नाही. आणि ते ज्ञान सद्गुरू देऊ शकतील अर्थात ज्यांना मी कोण आहे याचे ज्ञान झालेले आहे तेच हे सांगू शकतील इतर नाही. पण असे महात्मे अत्यंत दुर्लभ आहेत गुरु अनेक आहेत पण सद्गुरू एखादाच असतो.
जेव्हा मुमुक्षुला प्रश्न पडतो कि ‘संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी । प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ... मी कोठुनि कोण आलो कसा हो । स्त्रीपुत्रस्वप्नातचि गुंतलो हो । ऐसें कळोनी मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ समर्थ श्री रामदास स्वामी. तेव्हा ईश्वर कृपा होऊन त्याला त्या महात्म्याची भेट होते, व तो महात्मा त्याला आत्मज्ञान करून देतो. पंचीकरण नावाचा एक ग्रंथ आहे त्यात एक दृष्टांत आहे. एक सिंहीण गर्भवती असते आणि सिंहीण जंगलात प्रसूत होते. तेथेच तिचा मृत्यू होतो हा सर्व प्रकार एक मेंढपाळ बघतो व तो त्या छाव्याला घेऊन येतो, आपल्या मेंढरामधेच त्याचेही पालन पोषण करतो ते सिहांचे पिल्लू मेंढरामधेच वाढते व त्यांच्याबरोबरच गवत, घास खावून राहते. त्यांच्यासारखेच बे बे करीत ओरडते सुद्धा. एक दिवस एक सिंह अचानक येतो व मेंढराची शिकार करण्याच्या हेतूने झेप घेतो. सगळे मेंढरे घाबरून बे बे करीत पळू लागतात. त्याचबरोबर हा मेंढरातील सिंह सुद्धा बे बे करीत पळू लागतो. आता मात्र आश्चर्यचकित व्हायची पाळी या ख-या सिंहाची होते. त्याला वाटते कि हा सुद्धा सिंह आहे आणि याने डरकाळी फोडण्या ऐवजी बे बे करतोय ! तो सिंह मेंढराची शिकार करण्याऐवजी या सिंहाला पकडतो. त्याबरोबर हा सिंह जोरजोरात बे बे करतो. खरा सिंह त्याला रागावतो आणि म्हणतो अरे ! तू कोण आहेस? तेव्हा तो सिह म्हणतो अरे ! मला मारू नको मी मेंढरू आहे ... मग हा सिंह त्याला पकडून एक तलावाजवळ नेतो आणि त्याला सांगतो कि , हे बघ तू मेंढरू नाहीस. तू सिंह आहेस. ह्याला ते पटत नाही कारण त्याचे सर्व जीवन त्या मेंढरात गेलेले असते त्याला स्वत:विषयी खरी ओळख राहिलेली नसते. मग हा सिंह त्याला आपले प्रतिबिंब दाखवतो आणि त्याचे रूपही त्याला पाण्यात दाखवतो व दोघातील साम्य दाखवून तू सिंह आहेस हे पटवून देतो. याची पण समजूत पटते कि तो मेंढरू नसून सिंह आहे आणि लगेच तो त्याच सिंहा बरोबर जंगलत निघून जातो. तसेच जीवाची सद्गुरूची भेट झाल्यावर सद्गुरू त्याला सांगतात कि तू जीव नाहीस, तू देह नाहीस, तू या देहाचा साक्षी आहेस. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रन्थकोटिभि: । ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: ‘किंवा तत्वमसि ह्या महावाक्याचा उपदेश करतात व त्या साधकाचा निश्चय होतो कि ‘अहं ब्रह्मास्मि’ मी ब्रह्म आहे आणि याच समजुतीने अनुभवाने तो मुक्त होतो.
मनुष्य जीवनाचे खरे सार्थक याच अनुभवत आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने मी कोण आहे व मला कुठे जयायचे आहे याचा विचार केलाच पाहिजे व सद्गुरूला शरण जावून त्यांचा अनुग्रह घेवून त्यांची सेवा करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे भगवत गीता सुद्धा सांगते कि ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया’ ‘उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:’ हि खरी भारतीय संस्कृती आहे व मानवी जीवनाची इतिकर्तव्यता यातच आहे ..
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवाताश्रम , चिचोंडी (पाटील), ता.नगर.
ह. मु. मेलबोर्न , आॅस्ट्रेलिया
मो. क्र. ६१+०४२२५६२९९१