मनुष्य शरीरामध्ये सर्व गोष्टी दाखविता येतात. सर्व इंद्रिये ही कुठे आहेत हे सांगता येतात परंतु मन नावाचे इंद्रिय कुठे आहे? कसे आहे? केवढे आहे? हे सांगता येत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात...हे मन कैसे केवढे । ऐसे पाहो म्हणो मी तरी न सापडे ।।एरव्ही राहाटावया थोडे । त्रैलोक्य राया ।।हे मन कुठे व कसे आहे हे सांगता येत नाही पण या मनाला फिरायला जायला संपूर्ण त्रैलोक्यही कमी पडेल असे हे मन आहे हे मात्र खरे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संत तुकाराम महाराज तर म्हणतात...बहुत चंचल चपळ ।जाता येता न लगे वेळ ।।हे मन चंचल व चपळ असे आहे. एखादी गोष्ट ताबडतोब पूर्ण करणे याला चपळ म्हणतात व एखादी गोष्ट अर्धवट सोडून जाणे याला चंचल म्हणतात. मनाने जर ठरविले तर कोणतेही काम ताबडतोब पूर्ण होईल,म्हणून मन चपळ आहे.मनाने जर सहकार्य नाही केले तर सर्व कामे अर्धवट राहतील म्हणून हे मन चंचलही आहे फक्त गंमत अशी आहे की, बºयाच वेळेस हे मन संसारात गेले की चपळ असते. परमार्थात आले की चंचल होते असे हे मन चंचल व चपळ स्वरुपाचे आहे.या मनाचा चंचल स्वभाव सांगताना अनेक ठिकाणी माकडांचा दृष्टांत दिला जातो. मर्कटस्य सुरापानं तश्च वृश्चिक दंशनम ।तन्मध्ये भूत संचारो यदा तदा भविष्यती ।।मुळातच माकड ते चंचल असणारच. त्याच माकडाला विंचू चावला, त्यामध्येच मद्यप्राशन केले, त्याच माकडाला भूतबाधा झाली तर ते माकड जेवढे चंचल तेवढे मन चंचल आहे. असे शासन सांगते. संत ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात की, हे मन असे विचित्र आहे की,जे बुद्धीते सळी । निश्चयाते टाळी ।धैर्याशी हातफळी । मिळवूनि जाय ।।जे विवेकाते भुलवी ।संतोषासी चाड लावी ।बैसिजेतरी हिंडती । दाहीदिशा ।।हे मन बुद्धीला निश्चयापासून बाजूला करते. धैर्याचे खच्चीकरण करते. विवेकाला नष्ट करते, मनुष्य जीवनामध्ये समाधान राहू देत नाही. एका ठिकाणी बसवून दाहीदिशांना फिरविणारे असे हे विचित्र मन आहे.
सामान्य माणूस हा या मनाचा दास असतो व हे मन मात्र संताचे दास झालेले असते. या मनावरही मालकीपणा येतोे तो फक्त संत तत्त्वाचा ! याचे कारण या मनाचा संपूर्ण परिवार हा या संताचा दास झालेला आहे. मग प्रश्न पडतो की, या मनाचा विस्तार काय? या मनाचा परिवार म्हणजे काय? याचा विचार पुढे करू.
-ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेधामणगावकर, पंढरपूर