प्रेषित मोहम्मद (स.) यांनी इस्लामी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून अनेक सामाजिक बदल घडवून आणले. प्रेषितांनी इस्लामी तत्त्वज्ञानात माणसाविषयी इस्लामची भूमिका, माणसांच्या समूहाविषयीची धोरणे त्यांच्या मूलभूत तत्त्वज्ञानातून मांडली आहेत. या तत्त्वज्ञानाचे कुरआन आणि हदिस हे दोन मुख्य स्रोत आहेत.
इस्लाम त्याच्या अनुयायांना सामाजिक आचारांची संहिता प्रदान करतो. त्याद्वारे इस्लाम समाजासमोरील अडचणी दूर करण्यासाठीचे सामाजिक भान मुस्लिमांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. इस्लामने मुस्लिमांना शेजाºयापासून गरीब, याचक आणि असाहाय्य, अपंग लोकांशी कसे वागले पाहिजे, याचे नियम सांगितले आहेत. त्यामध्ये इस्लाम कुरआनने त्याविषयी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, ‘आप्तशेजारी, अनोळखी शेजारी व तोंडओळख असणारा सहकारी व वाटसरू त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा. विश्वास ठेवा की, अल्लाह एखाद्या अशा व्यक्तीला पसंत करीत नाही जी अहंकारी, गर्विष्ठ असते आणि आपल्या मोठेपणाचा अहंकार बाळगते’ (दिव्य कुरआन ४/३६) शेजाºयाच्या संदर्भात प्रेषितांची एक हदिस (प्रेषित वचन) देखील आहे. ही हदिस हजरत आएशा (रजि.) आणि अब्दुल्लाह ( रजि.) यांनी कथन केली आहे.
‘प्रेषित (स.) एकदा म्हणाले की, अल्लाहचे दूत जिब्रईल (अ.) यांनी शेजाºयांना सभ्यतेची व उदारतेची वागणूक देण्यावर इतका भर दिला आहे की, मला कधी शंका वाटते की, शेजाºयांना वारसा हक्काचा अधिकार तर दिला जात नाही ना?’ याप्रमाणेच अब्दुल्लाह (रजि.) यांनी एक हदिस कथन केली आहे. त्यामध्ये प्रेषित (स.) म्हणतात, ‘तो मनुष्य मुस्लीम नाही ज्याचे पोट भरलेले आहे आणि त्याचे शेजारी मात्र उपाशी आहे.’ शेजाºयाविषयीची अनेक नैतिक कर्तव्ये इस्लामने सांगितली आहेत. शेजाºयांप्रमाणेच गरिबांची काळजी घेण्याविषयी इस्लामने मुसलमानांना ताकीद केली आहे. कुरआनमधील ही आयत त्याबाबतीत उद्बोधक आहे. जे लोक नरकाच्या आगीत लपेटलेले असतील त्यांना विचारले जाईल.
‘तुम्हाला नरकाच्या आगीत कशामुळे पडावे लागले?’ ते लोक म्हणतील, ‘आम्ही त्यांच्यापैकी नव्हतो जे प्रार्थना करीत होते, आम्ही गरिबांना जेवू घालत होतो.’ म्हणजे गरिबांची भूक दूर करण्याला इस्लामने प्रार्थनेच्या समकक्ष दर्जा दिला आहे. नोकरांना देखील इस्लामने सन्मानाची वागणूक देण्याविषयी बजावले आहे. श्रमिकांच्या मजुरीसंदर्भात प्रेषितांची एक हदिस आहे. जी अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांनी कथन केली आहे. त्यामध्ये प्रेषित (स.) म्हणतात, ‘मजुराला त्याचा घाम सुकण्यापूर्वी मजुरी द्या.’ हजरत अनस (रजि.) हे प्रेषित (स.) यांचे स्वीय सहायक होते.
त्यांनी दहा वर्षांच्या सेवेतील प्रेषितांच्या (स.) आठवणी सांगताना नमूद केले आहे की, ‘मी दहा वर्षांपासून प्रेषित (स.) यांच्याकडे काम करत आहे. परंतु ते एकदाही माझ्यावर रागावले नाहीत, अथवा त्यांनी टीकासुद्धा केली नाही. मी त्यांनी सांगितलेली कामे वेळेवर केली नाहीत तरी त्यांनी माझ्यावर टीका केलेली नाही. ते त्यांच्या नोकरांशी आणि घरातील लोकांशी एकसारखेपणाने वागत आणि आपल्या नोकरांना त्यांनी कधी मारहाण केली नाही.’ गुलामांच्या संदर्भात देखील इस्लामी तत्त्वज्ञानाने अत्यंत मानवतावादी विचार मांडले आहेत.
- आसिफ इक्बाल