- धनंजय जोशीआपण आणि आपले मन यामध्ये बरीच नाती आहेत. रागावलेले मन, आनंदित मन, निराश मन, शांत मन ...़ मनाचे कितीतरी आविष्कार आपल्याला दिसून येतात (आपण जर लक्ष दिले तर !) माझे झेन गुरु सान सा निम आम्हाला एका वेगळ्याच मनाची ओळख करून द्यायचे - त्याचे नाव ‘डोन्ट नो माइण्ड’ आता ‘डोन्ट नो’ ह्या इंग्लिश शब्दांचा सरळ सरळ अनुवाद केला तर त्याचा अर्थ होईल ‘माहीत नाही’! पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही.माहिती असणे म्हणजे अनेक गोष्टींचे ज्ञान असणे. मग हे मन कसे? ‘डोन्ट नो माइण्ड’... म्हणजे ज्ञानाच्या पलीकडे गेलेले किंवा ज्ञानावर न अवलंबून राहणारे मन. झेन गुरुजी विचारतात, ‘धनंजय हे तुझ्या शरीराचे नाव, तुझे मूळ नाव काय?’- त्याचे उत्तर ‘डोन्ट नो’! ते पुढे विचारतात, ‘तू आला असशील एका गावाहून; पण तुझे मूळ गाव कोणते?’ - उत्तर ‘डोन्ट नो’!
ह्या ‘डोन्ट नो’! मनाची ओळख झाली की, आयुष्याशी असलेले आपले सगळे नातेच बदलून जाते. मला त्या मनाला एक नवीन नाव सुचवावेसे वाटते - निर्मळ मन. निर्मळ का? तर ह्या मनाला शाब्दिक ज्ञानापासूनसुटका मिळालेली असते म्हणून!‘डोन्ट नो’बद्दल आणखीच गमतीची गोष्ट सांगतो.रशियामध्ये एक राबी सकाळी नेहेमीप्रमाणे प्रार्थनेसाठी मंदिराकडे चालले होते. जाताना एका पोलीस आॅफिसरने त्याना अडवून विचारले, ‘तुम्ही कुठे चाललात?’- राबी म्हणाले, ‘डोन्ट नो’- पोलीस आॅफिसरने रागावून विचारले, ‘व्हॉट डू यू मीन? गेली पंचवीस वर्षे तुम्ही रोज ह्याच रस्त्याने मंदिरात जाता, मला माहितेय ! परत विचारतो. कुठे चाललात?’- राबी परत हसून म्हणाले, ‘डोन्ट नो!’रागावलेल्या पोलीस आॅफिसरने राबींना बेड्या ठोकून पोलीस ठाण्यात नेले.तिथे त्यांना गजाआड केले जात असताना राबी हसत म्हणाले, ‘सी, यू रिअली डोन्ट नो, इजन्ट इट? मी म्हणत होतो, मला माहीत नाही!’