प्रगट झालेल्या अग्नीच्या संपर्कानेच लाकडातील सूक्ष्म किंवा बीजरूप अग्नी प्रकट होतो. तशी सूक्ष्म किंवा बीजरूप भावना चांगल्या किंवा वाईट भक्तांच्या सान्निध्याने प्रकट होतात. मुळात भावनांचा उच्चतम उत्कर्ष मनुष्याच्या प्रत्यक्ष संगतीतच प्रत्ययाला येतो. त्यामुळे माणसाच्या सान्निध्यात आलेल्यालाच त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते. राष्ट्रपुरुषांचा प्रताप पाहून अनेक लोकांच्या भावना प्रगट झाल्या. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी त्यांच्या प्रभावामुळे आपले जीवन त्यांच्यासाठी समर्पण केले. हजारो तरुणांनी त्यांच्यासाठी प्राणांच्या आहुती दिल्या. आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांना आपले जीवन समर्पित केले. याला भावनात्मक संसर्गजन्यता म्हणता येईल का, हा प्रश्नच आहे. कारण देशभक्तांच्या, थोर पुरुषांच्या, शूरवीरांच्या मागे हजारो लोक गेले व लाखो घरीच राहिले. याचे कारण असे म्हणता येईल की, मनुष्याच्या ठिकाणी भावना जितक्या तीव्र व पूर्णत्वाने प्रकट झाल्या असतील तितका त्यांचा प्रभाव पडला असे समजावे लागेल. कारण त्यांच्या सुप्त भावना झपाट्याने जागृत होताना दिसून येतात.
एखाद्याच्या प्रभावात येणे, त्यांच्या वचनानुसार वागणे यालाच समजावे त्यांच्या प्रभावी कार्याचा त्यावर परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी जे ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची माघार नसते. कारण त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाचा तो एक भाग असतो. ज्यांच्या अंत:करणात जो भाव आहे, त्यानुसार त्यांच्या मनात सुप्त इच्छा प्रकट होतात. त्यामुळे मनुष्याचे मन हे भावनांचे चालते-बोलते उदाहरण आहे. संगतीचा परिणाम प्रसिद्धच आहे. ज्यांच्या संगतीत राहावे तसे मन बनते. अर्थात जसे मनाने व्हावे असे आपल्याला वाटते, तशा संगतीत राहिल्याने मन तसे बनते. म्हणून थोर शूरवीरांच्या, संतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या संगतीत राहा तसे मन बनेल. वाईट गुणांचा त्याग करून चांगल्या गुणांचा अवलंब कराल. त्यामुळे मानसशास्त्राच्या दृष्टीने मनुष्याने केलेल्या संगतीचे महत्त्व व कार्य आपल्याला जाणवते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)