- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड )
परमेश्वर हा परम प्रेमाचा विषय आहे. प्रेम आणि परम प्रेम यात जमीन व आकाश इतके अंतर आहे. संसारातील प्रेमात घृणा, तिरस्कार, द्वेष इ.विकार निर्माण होऊ शकतात. संसारातील विषय हे अनित्य व दु:ख रूपच असतात. परमेश्वर मात्र सद् चिद् आनंद रूपच असतो. त्याच्या दर्शनापुढे कोणताही सर्व श्रेष्ठ आनंद नाही. संत निळोबाराय म्हणतात :--नित्यानंदापुढे आनंद तो कोण! विषय सुख बाई बापुडे तो शिन !!फक्त या आनंदाची अनुभूती येण्यासाठी देव आणि भक्त यांचे तादात्म्य होणे गरजेचे आहे. देव आणि भक्त एक रूप व्हायला हवेत. मंडळी, प्रेम अनन्य शरणागती, निर्माण झाल्याशिवाय परमेश्वराविषयी परम प्रेम निर्माण होणार नाही. मग संसारातील यच्चयावत विषय तुच्छ वाटतील. माऊली विरहिणीच्या अवस्थेत स्वानुभव प्रगट करतात. कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करितो गे माये
न लावा चंदनु न घाला विंझणवारा,हरिविणे शून्य शेजारूं गे माये चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगे भेटवा का मंडळी, नदी ज्या प्रमाणे सर्वस्वी समुद्राला जाऊन मिळते व सागर रूप बनते. तसा परम प्रेमाने भक्त भगवंतालाच जाऊन मिळतो. मीठ जसे पाण्यात पडल्यावर मीठ रूपाने वेगळे उरतच नाही. अगदी तसेच. ...!संत म्हणतात, जळी पडलिया लवना ! सर्व ही जळ होय विचक्षणा !!माऊलीच्या या विरहिणीत आर्तता, व्याकुळता, सामावलेली आहे. प्रेम म्हटल की विरह हा आलाच. विरहाच्या वेळीच माणसाच्या खऱ्या प्रेमाची कसोटी कळते. आपल्या आवडत्या प्रियतमाची वाट बघण्यात, त्याच्या विरहाने व्याकुळ होण्यात देखील एक विलक्षण आनंद असतो. भगवंतावर प्रेम करणारी विरहिणी म्हणते,कृष्णे विंधिंली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करितो गे माये!! अगं सखे जरा खिडकी लावतेस का. ..? ती म्हणते का गं. .? विरहिणी म्हणते, मला चंद्रमा उबारा करतो गं....सखी म्हणते, थांब मी तुझ्या अंगाला चंदन लावते. विरहिणी म्हणते, न लावा चंदनु न घाला विंझनवारा. अग मला श्रीहरि वाचून सगळे शून्यवत वाटत गं...! मी त्या भगवंताची कधीची वाट बघत आहे. माझ्या विरहाचा मदन मला आता जाळत आहे. माझ्या अंगातली चंदनाची चोळी मला तापलेल्या तव्यासारखी पोळत आहे. मला लवकरात लवकर त्या वनमाळीला भेटवा. माऊलीची ही विरहिणी चितेवर जळणाऱ्या सतीप्रमाणे आहे. भक्तीची उच्चतम अवस्था या विरहिणीत सामावलेली आहे.
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांचा भ्रमणध्वनी 8329878467 )