वैराग्यप्राप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:51 AM2019-06-22T02:51:55+5:302019-06-22T02:53:51+5:30
आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे.
- वामनराव देशपांडे
देहभावना नष्ट झाल्याशिवाय परमात्माप्राप्तीच्या साधनेला आवश्यक असणारी गती प्राप्तच होत नाही. दहाही इंद्रिये वासनाग्रस्त असतात. आपण कोणी तरी श्रेष्ठ पुरुष आहोत, हा अहंकार साधनेच्या आड येतो. तसेच जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीर वेदना आणि दु:खांना सामोरे जावे लागते. सुखदु:खांनी लडबडलेले आयुष्यसुद्धा करीत असलेल्या नामसाधनेच्या सतत आड येत राहते. त्यासाठी काय उपाय करावे यावर भगवंत हितोपदेश करतात.
इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहक्कार एव च।
जन्ममृत्युजराव्याधिदु:दोषानुदर्शनम।।
आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत इंद्रिये आपापल्या विषयसेवनांपासून अलिप्त होत नाहीत, तोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होतच नाही. अहंकारी वृत्तीचा दंश साधकाला चुकूनही होता कामा नये. अहंकार साधनेला मारक ठरतो. तसेच जरा-व्याधींकडे लक्ष केंद्रित करणे साधनेला हितकारक होत नाही. म्हणून साधकाने व्याधींकडे वा वाढत जाणाऱ्या वयाकडे दुर्लक्ष करावे. हे जे दु:खरूप होणे, म्हणजे शारीर भाव मनात सळसळत राहणे असते ते करीत असलेल्या साधनेला निश्चितपणे हानी पोहोचवते हे निश्चित. सत्य म्हणजे नेमके काय? सत्य काय तर सुखाची प्राप्ती अविरत व्हावी ही तीव्र इच्छा मानवी दु:खाचे कारण आहे. एकदा का सुखाच्या अभावाने दु:ख निर्माण झाले की, विवेक संपुष्टातच येतो. सुख काय अथवा दु:ख काय, ही मनोनिर्मिती आहे. त्याचा आपण त्याग केला पाहिजे. भगवंत सतत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच साधक भक्तांना मोलाचा संदेश देतात की,
असक्तिरनभिष : पुत्रदारगृहादिषु।
नित्ये च समचितत्वामिष्टानिष्टोपपत्तिषु ।।