आनंद तरंग- पापामुळे सत्याचे वाटोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:29 AM2019-09-09T02:29:09+5:302019-09-09T02:29:33+5:30
गेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो,
प्रा. शिवाजीराव भुकेले
गेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो, तर पापाला भित राहतो. आपल्या देशात सत्तर टक्क्यांहून अधिक माणसे पापभिरूआहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्रावर माणसांची गर्दी ओसंडून वाहत आहे. देवी-देवतांच्या देवळाच्या भिंंतीला सिमेंट आणि मातीसुद्धा शिल्लक राहत नाही एवढे त्यांचे उंबरे झिजविले जात आहेत. या वेळी सुज्ञ माणसाच्या मनात राहून-राहून एकच प्रश्न उभा राहतो. अत्याधुनिकतेची समज येऊनसुद्धा आमच्या घड्याळाचे काटे उलटे तर फिरत नाहीत ना? पाप मनाने करायचे आणि धुऊन शरीराला काढायचे हा कुठला पापक्षालनाचा न्याय? मुळात पाप ही एक रोगट मानसिकतेची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नको ती कृती करायला लावते आणि अशा कृती समाजाला विकृत करीत राहतात. आपण किती पापी आहोत याचे भूत-भविष्य वर्तविण्यासाठी कुठल्या गुरूची गरज नाही. तोंडात देवाचे नाव आणि बगलेत सुरी असेल. वरून-वरून दान-धर्माची दांभिक कृती करायची आणि मनात परधन, परनारी यांना ओरबाडून काढायचे प्लॅनिंंग सुरू असेल, दुसऱ्याला काटा रुतल्यानंतर आपले दात दिसत असतील, दुसºयाचे आसू हेच आपले हसू असेल तर आपण शंभर टक्के पापी आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. अशा पापात्मक प्रवृत्तीमुळे सत्याचे पार वाटोळे झालेय म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करताना तुकोबाराय म्हणतात -
पापाचिया मुळे, झाले सत्याचे वाटोळे।
दोष जाहले बळीवंत, नाही ऐंसी जाली नीत ।
मेघ पडो येतो भीती, पिके साडीयली क्षिती ।
तुका म्हणे काही वेदावीर्य शक्ती नाही॥
समाजात जेव्हा पापात्मक दोष बलवंत होतात तेव्हा त्या समाजातील दोषी मंडळींची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.