आनंद तरंग - तुमच्या ‘स्व’चा अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:31 AM2019-09-04T05:31:33+5:302019-09-04T05:31:35+5:30
दुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवतात.
सद्गुरू जग्गी वासुदेव
दुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवतात. जर एखादी गोष्ट आभूषण म्हणून तुम्ही अनुभवायला लागलात की, मग ते तुमच्यापासून दूर करणं फार कठीण होऊन जातं, पण जर तुम्ही त्यांना वस्तुत: बेड्या, बंधनं आहेत असं पाहिलं, तर तुम्हालाच त्या मोडून टाकण्याची इच्छा जागृत होईल. समजा जर मी तुम्हाला लोखंडी साखळ्यांनी बांधलं तर तुम्हाला लगेच कळेल की, तुम्ही बंधनात आहात आणि ज्या क्षणी तुम्हाला कळेल की, तुम्ही बेड्यांत अडकला आहात; त्याच क्षणी त्यातून मुक्त होण्याची तळमळ निर्माण होईल. मात्र, समजा मी तुम्हाला सोन्याच्या साखळीने बांधलं, तर तुम्हाला वाटेल की, हा तर दागिना आहे. दोन्ही साखळ्या तुम्हाला तितक्याच ताकदीने बांधून ठेवतात, पण हे लक्षात येण्यासाठी तुम्ही संपूर्ण आयुष्य घालवता. अलंकार, आभूषण म्हणून जे काही तुम्ही परिधान करता, त्या तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या असल्या, तरीही तुम्हाला स्वत:हून त्या दूर करणं शक्य नाही. तुम्ही त्या दूर करू शकत नाही असं नाही, तुम्ही करू शकता, पण सहसा तुम्ही ते करत नाही. दुसºयाने तुम्हाला मदत करावी लागते आणि तोच तुमचा गुरू आहे.
गुरू हा काही कुणी तुमचे सांत्वन करणारा नाहीये. स्वखुशीने तुम्ही तुमच्या ‘स्व’चा अंत करण्यासाठी जो तुमचे मार्गदर्शन करतो तो गुरू. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि तुमचे मर्यादित अस्तित्व सतत पायदळी तुडवतो तो गुरू. त्यांच्या सानिध्यात नेहमी तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्या सहवासात राहावेसे वाटते, असं असेल, तर ते तुमचे गुरू आहेत. सामान्यत: जेव्हा तुम्हाला अस्वस्थ, अवघडल्यासारखे वाटते, तेव्हा तिथून पळून जावेसे वाटते. तुमच्या गुरूंच्या उपस्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत राहावंस वाटतं.