विजयराज बोधनकरगणपती बाप्पा गेले. आनंद सोेहळा पार पडला, दहा दिवस भक्तीचे गेलेत, समाज एकत्र आला, मंडपे उभारलीत, रोषणाई केली, भव्य मूर्ती पुजल्या गेल्यात, दान पेट्या भरल्यात, पूजा साहित्य विक्रेते सुखावलेत, व्यापार बहरला, अख्खा समाज उत्साहाने आनंदून गेला. पण यातून खरे फलित हाती लागले का की फक्त उत्सव साजरे झालेत? काही गणेश मंडळाचा गणपती मंडपात झाकून ठेवल्यामुळे व महान अभिनेते, अभिनेत्री दर्शनाला आल्यामुळे मोठ्या रांगा लागल्यात, मीडियाने सतत सेलिब्रटींचा मारा केल्यामुळे भक्तगण त्या मृगजळामागे धावू लागलेत, जो गणपती मीडियावर झळकतो तो पावणारा देव असा शिक्कामोर्तब भक्तगण करत गेले आणि रांग वाढतच गेली. रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यावर खरंच श्री गणेश पावतो का? घरात आणलेला गणपती हा नवसाला न पावता सार्वजनिक गणपती नवसाला पावणारा गणपती असतो असं कुणी सिद्ध करेल का?
गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का? तर अजिबात नाही. देवापुढे पैसे ठेवण्याची आपली परंपरा आहे, कारण मंदिरातला होणारा खर्च सर्व भक्तांनी स्वेच्छेने उचलावा यासाठी आपण पेटीत पैसे टाकतो.. पण गणेश उत्सवातला गणपती हा मंदिरातला गणपती नसतो तर मंडपातल्या गणपतीला कोट्यवधींच्या मालमत्तेची खरंच गरज असते का?
समाज आज वैचारिकदृष्टया फार पुढे गेला आहे. पण, विज्ञानाचं युग येऊनही वैचारिकता अजूनही का हवी तशी फुलत नाही, भक्तीचा अर्थ कर्माशी का लावला जात नाही? देवत्व हे कर्मातून फुलत असतं... हा भाव ज्या दिवशी उमटेल त्यादिवशी श्री गणेशाच्या अध्यात्माने सर्वत्र उजळून निघेल, गणपतीइतकी वैचारिकता उंच झाली तरच हे शक्य आहे. उद्या गणेश मूर्तीची जी अवस्था आपण पाहू त्यावरून आपण बदलले पाहिजे हे आपल्या ध्यानी येईल...