माता अमृतानंदमयीचुका करणं हा मानवी स्वभाव आहे. आयुष्यात कधीच चूक केली नाही असं कुणीही नाही. चूक म्हणजे केवळ जे करता कामा नये ते करणं नव्हे, तर जे करायला पाहिजे ते न करणंही चूक असतं. काही लोक अज्ञानातून चुका करतात. काही जण परिस्थितीच्या दबावामुळे चुका करतात. कारण काहीही असलं, तरी चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे, चूक झाली आहे हे मान्य करणं. एकदा आपली चूक समजली, की आपण पश्चात्ताप करायला हवा. पश्चात्ताप हे एक प्रकारचे प्रायश्चित्त असतं. पश्चात्तापाच्या अश्रूंनी धुतलं जाणार नाही असं कोणतंही पाप नसतं, मात्र आपल्याला काय योग्य आहे हे माहीत असते, तेव्हा चूक परत होता कामा नये. काही लोक फक्त दाखवण्यापुरतं पश्चात्तापाचं ढोंग आणतात. पश्चात्ताप प्रामाणिक असायला हवा. एकदा चूक समजल्यानंतर ती सुधारण्याचा आणि परत न करण्याचा ठाम निर्णय घेतला गेला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस चूक करतो तेव्हा आपली विवेकबुद्धी आपल्या अंतर्मनात कुजबुजत असते, ‘हे करू नको, ते करू नको.’ या सदसद्विवेकबुद्धीचं ऐकलं, तर आपण कधीच भटकणार नाही. माणूस कित्येकदा अज्ञानातून चूक करतो. देव अशा चुकांना माफ करो. मात्र, चूक परत परत झाल्यास तो माफ करणार नाही. म्हणूनच चूक पुन:पुन्हा घडता कामा नये. मानवी आयुष्य हे अयोग्याकडून योग्यतेकडे जाणारा प्रवास आहे. पश्चात्ताप झाला की मनुष्य योग्य मार्गावर चालण्याचा किमान विचार तरी करतोच. चुका तर होणारच. मात्र, त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण प्रत्येक विचार, शब्द आणि कृती चांगुलपणाने करायला हवी. क्षुल्लक चुकांचाही पश्चात्ताप करणं, त्या सुधारण्यासाठी पुढे होणं आवश्यक आहे. तरच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रारंभ होतो. हा मार्ग कधीही न संपणाऱ्या विजयाचा आहे. अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.
आनंद तरंग - पश्चात्ताप खरा हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 3:45 AM