- रमेश सप्रेगोष्ट तशी गमतीची आहे; पण नीट लक्षात घेऊन चिंतन केलं तर तिचा संदेश (शिकवण हा शब्द जुना झाला. हल्ली कुणीही कुणाकडून शिकत नाही. विशेष म्हणजे शिकायला सगळे तयार असतात. म्हणून कथेचा संदेश म्हटलं-मॅसेज. असो) एकदा सर्व देवदेवतांची महत्त्वाची सभा होती. आपापल्या वाहनावरून सर्वजण सभास्थानी जमू लागले. सर्वप्रथम गरुडावर बसून विष्णू भगवान आले. नंतर हंसावर बसून ब्रह्मदेव, नंतर जरा उशिरा नंदीवर बसून शिवशंकर आले. देवीही आल्या सरस्वती मोरावरून, लक्ष्मी घुबडावरून तर व्याघ्रेश्वरी, सिंहवाहिनी आपल्या वाघ-सिंहाच्या वाहनांवरून पोचल्या. शेवटी शेवटी मूषकावर बसून गणपतीची स्वारीही आली. अगदी शेवटी रेडय़ावर बसून यमराज आले. प्रत्येकानं आपापली वाहनं बाहेर ठेवली. अनेक प्रसंगी भेटी झाल्यामुळे वाघ-सिंह हे नंदीशी, पक्षिराज गरुडाशी प्रेमानं बोलत होते.यमराज आल्यावर सारे शांत झाले. यमाचा दराराच तसा होता. संथपणे रेडय़ावरून सभास्थानी प्रवेश करताना शेजारच्या झाडावर एक कावळा बसलेला दिसल्यावर यमराज त्याच्याकडे पाहून हसले. हे सर्वानी पाहिलं. यमाची दृष्टी पडणंही फार चांगली गोष्ट नाही हे विचारात घेऊन सर्व वाहनं म्हणून आलेल्या पशु पक्ष्यांनी गरुडाला विनंती केली. ‘तू पक्ष्यांचा राजा आहेस ना? मग या कावळ्याला साक्षात मृत्यूचा देव असलेल्या यमापासून वाचव. यमाची दृष्टी पडणं म्हणजे मृत्यू जवळ येणं. गरुडाला हे पटलं. कावळ्याजवळ जाऊन गरूड म्हणाला, ‘बस माझ्या पाठीवर मी तुला सुरक्षित ठिकाणी पोचवतो.’ कावळा पटकन बसला कारण त्याची आणि यमाची नजरानजर झाल्यावर यम हसला होता त्यामुळे कावळाही भयानं व्याकूळ झाला होता. गरुडानं पंख फैलावून आकाशात झेप घेतली. सात पर्वत, सात समुद्र, सात अरण्य पार करून एका दरीत असलेल्या बिळात कावळ्याला ठेवलं. आपण इतक्या दूर आल्यामुळे आपल्यावरचं संकट टळलं असं वाटून कावळ्यानंही सुटकेचा निश्वास टाकला. अतिशय वेगानं उड्डाण करून गरूड सभास्थानी पोचला तेव्हा सभा संपून देवदेवता सारे बाहेर पडू लागले. यम बाहेर आला. त्यानं त्या झाडाकडे पाहिलं तिथं तो कावळा नाही असं पाहून त्याला हसू आलं. हे पाहून गरुडाला राहावलं नाही. त्यानं यमराजाला विचारलं, ‘मृत्यूदेव तो कावळा झाडावर होता तेव्हा तुम्ही हसलात. आता तो तिथं नाही तरीही तुम्ही हसताय. याचा अर्थ काय समजायचा?’ यावर यमराज शांतपणे म्हणाला, ‘मी सुरुवातीला हसलो कारण या कावळ्याचा मृत्यू येथून खूप दूर सात पर्वत, सात समुद्र, सात अरण्य पार करून एका दरीतल्या बिळात असलेल्या अजगरानं गिळून होणार होता म्हणून हा कावळा तिथपर्यंत पोचणार कसा या विचारानं मी हसलो. आताही हसलो कारण तो कावळा झाडावर नाही त्या अर्थी माझं काम कुणी तरी सोपं केलेलं दिसतंय! यावर गरुड खजील झाला. त्याच्या एक लक्षात आलं विश्वात घडणा:या सा-या घटना पूर्वनियोजित असतात. तशाच त्या अटळही असतात. त्यानं मनातल्या मनात कावळ्याची क्षमा मागितली. कारण त्यानंच त्या कावळ्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना प्रत्यक्ष मृत्यूच्या तोंडात ढकललं होतं.खरंच, समर्थ रामदास ‘मनाचे श्लोक’मध्ये म्हणतात त्याप्रमाणो या कथेचा असाही संदेश आहे की घडणारी घटना अटळ नि पूर्वनियोजित असेल तर तिचा आनंदानं, शांतपणे स्वीकार करणंच चांगलं. कधी कधी घटना घडताना ‘असं का घडलं’ असा विचार आपल्या मनात येतो; पण आपण आधी केलेल्या भल्याबु-या कर्माचं फळ म्हणूनच सर्व घटना प्रसंग घडतात. जर जीवनातील घटना अटळ असतील तर त्या मुक्त मनानं नि आनंदानं स्वीकारून येथून पुढील आयुष्यात अतिशय सावधपणे चांगल्या कर्माचा (पुण्यकर्म) आचार केला पाहिजे नि वाईट कर्माचा (पापकर्म) त्याग केला पाहिजे. एका शाळेत जाणा:या मुलीला एका औषधाची प्रतिक्रिया (रिअॅक्शन) होऊन तिच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण एवढंच काय पण मेंदूची क्रियाशक्ती या सर्व संस्थांवर (सिस्टम्स) विपरीत परिणाम झाला. तिच्या पालकांनी, विशेषत: तिच्यासाठी सर्व प्रकारचे इलाज, उपचार करून पाहिले. हळूहळू परिणाम जाणवू लागला. तिची प्रकृती सुधारू लागली. नंतर त्या मातेनं मुलीच्या शिक्षणासाठी अक्षरश: प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती मुलगी सर्वसामान्य शाळेत नि पुढे महाविद्यालयात जिद्दीनं शिकू लागली. तिच्या शिक्षणात तिचे वर्गमित्र-मैत्रिणी आणि प्राध्यापकांनी सर्व प्रकारची मदत केली. तिला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. नंतर एका बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनमध्ये नोकरीही मिळाली. सर्व आव्हानानंतर मात करून ती पुढे पुढे जात राहिली. यात कौतुक दोघींचंही होतं. कोणतीही तक्रार न करता सर्व संकटांचा स्वीकार करून जीवनातील अटळ घटनांवर प्रय}पूर्वक मात केली. इतरांप्रमाणो ‘ओ गॉड, व्हाय मी?’ ‘हे देवा, ही सारी संकटं माझ्यावरच का कोसळली?’ असं रडत न बसता त्यांनी हसत हसत संकटांवर विजय मिळवला. त्यांच्या सकारात्मक जीवनशैलीला सलाम!